

Dr Suresh Sawant’s Contribution to Children’s Literature
esakal
डॉ. श्रीकांत पाटील
‘कावळ्यांच्या एकीचे बळ’ कथेत संकटात सापडलेल्या कावळ्यासाठी हजारो कावळे एकत्र आल्याचे दाखवून पक्ष्यांमधील निष्ठा आणि एकोप्याचा धडा माणसाला दिला आहे. तर ‘सर्जा-राजाने वाचविले प्राण’ ही कथा वीज पडून बेशुद्ध झालेल्या मालक-मालकिणीला समयसूचकतेने सुरक्षित घरी पोहोचवणाऱ्या बैलांच्या स्वामिभक्तीचे हृदयस्पर्शी वास्तव मांडून मुक्या प्राण्यांमधील भावनिक नात्यांचा आविष्कार घडवते.
मराठी बालसाहित्यात डॉ. सुरेश सावंत हे अत्यंत आदराचे आणि मानाचे नाव आहे. बालशिक्षण, बालसाहित्य आणि मूल्याधिष्ठित लेखन या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखणीतून बालकथा, बालकादंबऱ्या, बालकविता आणि समीक्षात्मक साहित्याची समृद्ध परंपरा निर्माण झाली आहे. मुलांचे भावविश्व समजून घेत त्यांच्यामध्ये मानवी मूल्ये, वैज्ञानिक दृष्टी, पर्यावरणप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार आणि आभाळमाया या प्रयोगशील बालसाहित्यकृतीसाठी साहित्य अकादमीचा सन्मान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेला मटकासुर आणि बिजली कथासंग्रह त्यांच्या समृद्ध साहित्यप्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.