

Zohran Mamdani NYC Mayor
esakal
आपल्या राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना मुंबई महापालिकेइतक्याच महत्त्वपूर्ण अशा अमेरिकेतल्या न्यूयॉर्क महापालिकेच्या महापौरपदाची सूत्रे झोहरान ममदानी यांनी स्वीकारली. ममदानींचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतीय वंशाचे असून, न्यूयॉर्कच्या महापौरपदी विराजमान झालेले पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत. आपल्याकडे मुंबईला स्वप्नांची नगरी, मोहमायेचे शहर असे संबोधले जाते. न्यूयॉर्कची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. व्यापारीदृष्ट्या मुंबई आणि न्यूयॉर्कचे स्थान त्या त्या देशातल्या अर्थक्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे आहे. राज्याच्या राजकारणात मुंबईच्या महापौरपदी ‘खान’ येणार असा प्रचार चालू असताना न्यूयॉर्कच्या महापौरपदी मुस्लिम व्यक्तीची निवड होणे हा योगायोगच! मुंबई आणि न्यूयॉर्कची तुलना करण्याचा किंवा दोन्ही शहरातील राजकारणाची सांगड घालण्याचा हेतू येथे मुळीच नाही, मात्र सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प असलेल्या या दोन महापालिकांच्या वाटचालीचा आणि साम्यस्थळांचा विचार करावाच लागेल.