

Eri Silk Meghalaya
esakal
वस्त्रनिर्मितीची ही स्थानिक कला मेघालयातल्या स्त्रियांनी अनेक शतकं जपली आहे ती मौखिक परंपरेद्वारे. पिढ्यान्पिढ्या आज्या, आया आणि काकवा-आत्यांकडून नाती, मुली आणि पुतण्या-भाच्या ही कला शिकत आल्या आहेत. मेघालयातले सगळे समुदाय वर्षानुवर्षं आपले पॅटर्न्स आणि रंग निष्ठापूर्वक जपतात, आणि आपल्या पुढच्या पिढ्यांमधल्या विणकरांसाठी वारशानं चालत आलेल्या कलावैशिष्ट्यामागची रहस्यं अबाधित ठेवतात.
मेघालय! सप्तभगिनींपैकी एक असलेला भारताच्या ईशान्येकडचा हा नितांत सुंदर प्रदेश. ब्रह्मपुत्रेच्या विशाल खोऱ्याचा एक भाग असलेली ही मेघभूमी आजही निसर्ग आणि संस्कृती यांचं अद्वैत राखून आहे. इथल्या खासी, गारो, जैंतिया, भोई अशा वेगवेगळ्या समुदायांनी निसर्ग आणि संस्कृतीचे परस्परांत गुंतलेले धागे ज्या अनेक मार्गांनी घट्ट बांधलेले आहेत, त्यातलाच एक म्हणजे इथली हस्तकला - एरी सिल्क. एरी रेशीमनिर्मितीची ही कला म्हणजे मेघालयातल्या टेकड्यांमध्ये कित्येक शतकांपासून सांगितली जाणारी, या प्रदेशाची ओळख झालेली सुंदर कथा आहे. अर्थात ईशान्य भारतातल्या आसाम, मणिपूर आणि नागालँडमध्येही ही हस्तकला रुजलेली आहे. पण गेल्या वर्षी म्हणजे २०२५मध्ये एरी सिल्कनिर्मितीसाठी भौगोलिक नामांकन मिळालं आहे ते मात्र मेघालयाला!