

Mental Health and Wellbeing
esakal
भक्ती क्षीरसागर
मानसिक स्वास्थ्यासाठी सीमोल्लंघनाची व्याख्या करायची, तर मनानं आखलेल्या मर्यादांच्या पलीकडे स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सीमोल्लंघन! हा प्रवास अर्थातच एका दिवसात होत नाही. त्याला काही पायऱ्या असतात. मानसिक स्वास्थ्यासाठी सीमा ओलांडताना आपण स्वतःपासून दूर जात नाही, उलट स्वतःच्या अधिक जवळ पोहोचत असतो.
कधी विचार केलायत, आपल्या आयुष्यातील सगळ्यात अवघड विजय कोणता असतो? इतरांवर मिळवलेला विजय? परिस्थितीवर मिळवलेला विजय? की स्वतःच स्वतःवर मिळवलेला विजय? खरंतर अनेकदा सगळ्यात अवघड असतं ते स्वतःच्या मनानं आखलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाणं, आपला कम्फर्ट झोन सोडणं, भीती वाटत असूनही एक पाऊल पुढे टाकणं.
‘मला हे करायचं आहे, पण माझ्याकडून होईल का?’, ‘मला हे जमणारच नाही’, ‘लोक काय म्हणतील?’, ‘मी आधी प्रयत्न केला होता, पण जमलं नाही’ अशा अनेक विचारांतून आपण स्वतःलाच पटवून देत असतो, की आपल्याला अमुक एक गोष्ट जमणारच नाही, आणि हळूहळू ही वाक्यं केवळ विचार न राहता आपल्या जगण्याच्या सीमा कधी होतात हे आपल्याला कळतच नाही. आपल्याला अडवणारी भिंत नेहमी बाहेर नसते, अनेकदा ती आपल्या मनातच उभी असते हे बऱ्याचदा आपल्याला लक्षातही येत नाही.
ता. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, गैरसमज आणि संकोच कमी व्हावा आणि गरज असताना मदत घेणं ही कमजोरी नसून स्वतःची काळजी घेण्याचा एक भाग आहे ही जाणीव वाढावी, यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. पण मानसिक स्वास्थ्याचा विचार केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये. मानसिक स्वास्थ्य म्हणजे आपण आपल्या विचारांकडे, भावनांकडे, निर्णयांकडे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे आपण कसं पाहतो याचा प्रवास आहे. या दसऱ्याच्या निमित्तानं स्वस्थ मानसिक आरोग्याच्या वाटेवर चालण्यासाठी सीमोल्लंघन करायला हवं.
सीमोल्लंघनाचा ढोबळ अर्थ होतो सीमा ओलांडणं. पण मानसिक स्वास्थ्यासाठी सीमोल्लंघनाची व्याख्या करायची, तर मनानं आखलेल्या मर्यादांच्या पलीकडे स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सीमोल्लंघन! हा प्रवास अर्थातच एका दिवसात होत नाही. त्याला काही पायऱ्या असतात.