

Metabolic Syndrome Prevention
esakal
डॉ. सुबोध देशमुख
मेटॅबोलिक सिंड्रोम हा कायमस्वरूपी राहणारा आजार नसून, तो जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पूर्णपणे रिव्हर्स केला जाऊ शकतो. केवळ पाच ते दहा टक्के वजन कमी केल्यास रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल पातळीत कमालीची सुधारणा होऊ शकते. यासाठी कोणत्याही महागड्या उपचारांची गरज नसते, केवळ रोजच्या जगण्यात शिस्त आणणे पुरेसे असते.
आजच्या आधुनिक युगात मानवी शरीराला अनेक नव्या आजारांनी विळखा घातलेला आहे. पूर्वी लोक एखाद्या विशिष्ट आजारानेच ग्रस्त असायचे, पण आजच्या काळात एकाच व्यक्तीमध्ये अनेक आजार एकत्र पाहायला मिळतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, वाढलेली साखर आणि बिघडलेले कोलेस्ट्रॉल एकत्र येते, तेव्हा त्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘मेटॅबोलिक सिंड्रोम’ असे म्हणतात. हा कोणताही एक स्वतंत्र आजार नसून, तो भविष्यात येणाऱ्या हृदयविकार आणि मधुमेहासारख्या मोठ्या संकटांची नांदी मानला जातो. आपल्या शरीराची चयापचय क्रिया पूर्णपणे बिघडल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. या सिंड्रोमच्या पाच मुख्य धोक्यांविषयी आणि त्यावरील उपायांविषयी सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.