

Renewable Energy Projects
esakal
जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आणि हवामान बदलाविरोधातील उपाय यांमुळे जगभरात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची उभारणी वेगाने होत आहे. आतापर्यंत जीवाश्म इंधनावरच भर देणाऱ्या पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका या भागातही अपारंपरिक ऊर्जेचे प्रमाण वाढत आहे. हा बदल आश्वासक असला, तरीही भ्रष्टाचार व अस्थिरता यांमुळे या प्रदेशातील काही देशांमध्ये अद्याप पुरेसा वेग दिसून येत नाही, हा चिंतेचा विषय आहे.
सुरुवातीला कच्चे तेल आणि गेल्या काही दशकांमध्ये नैसर्गिक वायूचे साठे सापडल्यामुळे पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिका प्रदेशाचे नशीबच पालटले. या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे या देशांकडे आर्थिक ओघ वाढू लागलाच, त्याचबरोबर इंधनाचे शस्त्र हाती आल्यामुळे या देशांचे जागतिक राजकारणातील महत्त्वही वाढले आहे. १९७३मध्ये झालेल्या अरब-इस्राईल युद्धामध्ये तेल उत्पादक देशांनी पाश्चिमात्य देशांविरोधात इंधन निर्यातीचे शस्त्र उगारले होते. त्यावेळी पहिल्यांदा जागतिक राजकारणातील तेलपुरवठ्याचे महत्त्व लक्षात आले होते. जागतिक हवामान बदलामुळे अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढू लागला आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांसह अनेक देशांनी लक्ष्य निर्धारित करताना अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्या तुलनेमध्ये अद्यापही जीवाश्म इंधनावरच अवलंबून असणाऱ्या पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका प्रदेशातही आता अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला चालना मिळाली आहे. या देशांमधील अपारंपरिक ऊर्जेचे प्रमाण अद्यापही कमी असले, तरीही प्रकल्पांच्या उभारणीच्या वेग जगामध्ये सर्वाधिक आहे.