

Migraine Symptoms and Causes
esakal
डॉ. सुबोध देशमुख
मायग्रेनवर विजय मिळवण्यासाठी स्वतःचे ट्रिगर्स शोधणे, ही सर्वात पहिली पायरी आहे. यासाठी रुग्णाने एक डायरी ठेवावी, ज्यामध्ये डोकेदुखी कधी सुरू झाली, तिची तीव्रता किती होती, हे लिहून ठेवावे. डोके दुखण्यापूर्वी काय खाल्ले होते, किती तास झोप झाली होती आणि किती वेळ स्क्रीन वापरली होती याची नोंद करावी. हे ट्रिगर्स एकदा समजले, की ते टाळणे रुग्णाला सहज शक्य होते. डॉक्टरांना योग्य उपचार ठरवण्यासाठीसुद्धा या डायरीची खूप मोठी मदत होते.
डोकेदुखी ही आजच्या काळात अत्यंत सामान्य वाटणारी, पण माणसाला हतबल करणारी एक मोठी समस्या आहे. अनेक लोक कोणत्याही तीव्र डोकेदुखीला सामान्य समजून वेदनाशामक गोळ्या घेतात आणि तात्पुरता आराम मिळवतात. मात्र जेव्हा ही डोकेदुखी वारंवार असह्य रूप धारण करते, तेव्हा तो अर्धशिशी अर्थात मायग्रेनचा आजार असण्याची शक्यता जास्त असते. बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, अपुरी झोप आणि वाढलेला स्क्रीन टाइम यांमुळे मायग्रेनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे हा त्रास पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. केवळ गोळ्यांवर अवलंबून न राहता आपल्या सवयी बदलल्यास या त्रासावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
साधी डोकेदुखी ही सामान्यतः संपूर्ण डोक्यात किंवा कपाळावर दोन्ही बाजूंना हलक्या किंवा मध्यम स्वरूपात जाणवते. ही डोकेदुखी विश्रांती घेतल्यावर किंवा चहा-कॉफी प्यायल्यावर काही वेळात बरी होते. याउलट मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसून, तो एक न्यूरॉलॉजिकल म्हणजेच मज्जासंस्थेशी संबंधित आजार आहे. यामध्ये डोक्याच्या एकाच बाजूला टोचल्यासारख्या किंवा धडधडल्यासारख्या तीव्र कळा येतात. हा त्रास काही तासांपासून ते सलग दोन-तीन दिवसांपर्यंत राहू शकतो. मायग्रेनच्या वेदना इतक्या तीव्र असतात, की व्यक्तीला त्याची दैनंदिन कामे करणेसुद्धा अशक्य होऊन बसते. साध्या डोकेदुखीपेक्षा मायग्रेनची तीव्रता आणि त्याची लक्षणे पूर्णपणे वेगळी असतात.