Women Cartoon World
Women Cartoon World Esakal

Women Cartoon World : सिंड्रेला ते राया आणि मिराबेल; कार्टूनच्या जगातील स्त्री पात्र कशी बदलत गेली? जाणून घ्या

राया आणि मिराबेलसारख्या नायिका आधुनिक काळाशी सुसंगत मूल्यं शिकवतात;

सिंड्रेलासारख्या नायिकांच्या व्यक्तिरेखांमधून दया, क्षमा, शांत वृत्ती यांसारखी मूल्यं अभिप्रेत असायची. पण अलीकडच्या राया आणि मिराबेलसारख्या नायिका आधुनिक काळाशी सुसंगत मूल्यं शिकवतात; मेहनती व्हा, कुटुंबावर प्रेम करा, खचू नका, धैर्याने वाटचाल करा, विश्वास ठेवा, संकटांचा सामना करा!

इरावती बारसोडे

डिस्ने म्हटलं की डोळ्यासमोर पहिला येतो तो मिकी माऊस, आणि त्यानंतर येतात त्या डिस्नेच्या राजकन्या किंवा नायिका. आपण नायिकाच म्हणू, कारण सगळ्याच काही राजकन्या नाहीत! सगळ्यात पहिली नायिका ‘स्नो व्हाइट’पासून (१९३७) अलीकडच्या ‘मिराबेल’पर्यंत (२०२१) सर्वच नायिकांच्या व्यक्तिरेखा काळानुरूप बदलत गेल्या.

म्हणजेच, नायिका संकटात सापडते, आणि नायक तिला वाचवतो, मग ते ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ आयुष्य जगतात... अशी सुरुवातीला एका ठरावीक साच्यामध्ये (थोड्याफार बदलांसह) असणारी कथा नंतरच्या काळात नायिकेभोवती गुंफली गेली.

एकविसाव्या शतकातील नायिकांना हॅपिली एव्हर आफ्टर जगण्यासाठी नायकांची गरज राहिली नाही. कर्तृत्ववान, लोकांचं हीत पाहणाऱ्या, समंजस आणि लढवय्या नायिका प्रेक्षकांसमोर येत गेल्या.

स्नो व्हाइटनंतर पन्नासच्या दशकात डिस्नेनं आणखी दोन राजकन्या प्रेक्षकांसमोर आणल्या, ‘सिंड्रेला’ (सिंड्रेला, १९५०) आणि ‘अरोरा’ (स्लीपिंग ब्यूटी, १९५९). पुढे १९८९मध्ये आला ‘एरियल’चा लिटल मरमेड.

स्नो व्हाइट, सिंड्रेला, अरोरा आणि एरियल या चारही नायिकांची कथा इथे पुन्हा सांगायची गरज नाही, ती सर्वांना ठाऊक आहे. या प्रत्येकीच्या आयुष्यात एक ‘प्रिन्स’ येतो आणि त्यांचं आयुष्य मुळापासून बदलून जातं, अशी एका वाक्यातसुद्धा ही कथा संपू शकेल.

सन १९९१मध्ये आलेल्या ब्यूटी अॅण्ड द बीस्टमधल्या बेलचं आयुष्यही ‘बीस्ट’मुळं बदलतं. हा बीस्ट म्हणजे एक शापित राजपुत्रच आहे. याआधीचे सगळे राजपुत्र ‘चार्मिंग’ होते, पण हा बीस्ट मात्र घमेंडी आहे. बेल ज्या गावात राहते, तिथल्या मुलींपेक्षा बेल फार फार वेगळी आहे.

तिला नटण्यामुरडण्यात स्वारस्य नाही. तिला वाचायला भयंकर आवडतं. पुढे जेव्हा बीस्ट तिला आपलं भलं मोठं ग्रंथालय खुलं करून देतो, तेव्हा ती हरखून जाते आणि बेलचं मन जिंकण्याचं काम बीस्टच्या दृष्टीनं आणखी थोडं सोपं होतं.

ब्यूटी अॅण्ड द बीस्टनंतर आलेल्या अलाद्दिन (१९९२) आणि पोकाहोंटस (१९९५) या दोन्ही चित्रपटांची कथा वेगळ्या प्रांतातली आहे.

एक अरब देशातली, तर दुसरी पोवहाटन इंडियन लोकांची. या दोन्हीही म्हटलं तर प्रेमकथाच आहेत. पण दोन्ही चित्रपटांमुळे वेगळ्या वर्णाच्या, वेगळ्या धाटणीच्या ‘जास्मिन’ आणि ‘पोकाहोंटस’ या नायिका डिस्नेनं समोर आणल्या.

सन १९९८मध्ये आलेला मुलान आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांपेक्षा वेगळा होता. चिनी ‘फा मुलान’ ना राजकन्या आहे, ना तिचं कोणा राजपुत्राशी लग्न होतं. उलट ती एक योद्धा आहे.

इतर मुलींप्रमाणे मुलानचंही योग्य वयात चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं अशी तिच्या घरच्यांची इच्छा आहे. पण मुलान मात्र मुलाचा वेश धारण करून तिच्या वडिलांच्या जागेवर युद्धात लढायला जाते.

ती मुलगी आहे हे कोणाला कळलं तर तिच्या मानेवरून तलवार फिरणार हे निश्चित आहे, तरीही ती जाते. शेवटी राजालाही वाचवते, आणि चीनवरचं संकटही दूर करते. राजासुद्धा तिला खाली वाकून अभिवादन करतो.

यानंतर थेट २००९-२०१० सालात उडी घ्यावी लागते. द प्रिन्सेस अॅण्ड द फ्रॉग ही कथा तशी सर्वज्ञात आहे. एक राजकन्या एका बेडकाचं चुंबन घेते आणि तो बेडूक खराखुरा राजकुमार होतो वगैरे... पण डिस्नेच्या द प्रिन्सेस अॅण्ड द फ्रॉग (२००९) चित्रपटाची नायिका ‘टियाना’ बेडूक रूपातल्या नवीनचं चुंबन घेऊन स्वतःच बेडूक होते. कारण ती राजकन्या नाहीये.

टियाना अतिशय मेहनती, कष्टाळू मुलगी. तिला स्वतःचं हॉटेल काढायचंय आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्या उलट यातला नायक म्हणजे ‘श्रीमंत बापाचा बिघडलेला पोरगा’ आहे. पण ही एक परीकथा असल्यामुळे अर्थातच नवीन टियानामुळे सुधारतो, जबाबदार होतो.

डिस्नेनं पिक्सार स्टुडिओजबरोबर २०१२मध्ये काढलेल्या ब्रेव्हमधील ‘मेरिडा’ खरंतर राजकन्या असूनही तिच्या वागण्या-बोलण्यातून चुकूनसुद्धा राजकन्या वाटत नाही. तिला राजकन्येसारखं वागायला जमतच नाही.

म्हणूनच तिची आई क्वीन एलिनॉर तिच्यावर सारखी चिडते. जेव्हा मेरिडाच्या लग्नासाठी वेगवेगळ्या टोळ्यांमधील उपवर मुलांमध्ये स्पर्धा सुरू होते, तेव्हा मेरिडासुद्धा त्यात भाग घेते. सगळ्यांपेक्षा उत्कृष्ट नेमबाजी करून स्वतःच जाहीर करते, ‘लग्नासाठी मीच माझा हात मागतीये’. कारण त्या उपवर मुलांपैकी कोणीच तिच्या लायकीचा नाही.

ही एका ‘ब्रेव्ह’ मुलीची कथा आहे. आई आणि मुलीच्या नात्याची कथा आहे. मेरिडा आणि एलिनॉरचं उसवलेलं नातं परत कसं विणलं जातं, याची ही कथा आहे. म्हणूच मेरिडा वेगळी ठरते.

सन २०१३मध्ये आलेला फ्रोझन माझा अतिशय आवडचा चित्रपट. फ्रोझन ही प्रेमकथा नाहीच मुळी. ही ॲरंडेलच्या राजकन्या असलेल्या दोन बहिणींची गोष्ट आहे, एल्सा आणि आना.

लहानपणीच्या काही घटनांमुळे दुरावलेल्या असल्या तरी या बहिणींचं एकमेकींवर प्रचंड प्रेम आहे. इतकं की त्या एकमेकींसाठी जिवाची बाजी लावायला तयार आहेत.

मोआना (२०१६) ही पोलिनेशियन बेटांवरच्या स्थानिकांची गोष्ट. ‘मोआना’ ही मॉन्टुनुई गावाच्या प्रमुखाची मुलगी. तिच्या वडिलांनंतर तीच गावाची प्रमुख होणार आहे. बेटावरच्या झाडाझुडपांवर, वनस्पतींवर रोग पसरू लागल्यावर मोआना एकटीच बोटीत बसून उत्तर शोधायला निघते.

माऊई नावाच्या डेमिगॉडला आपल्या बाजूने वळवून त्याची मदत घेते, आणि यशस्वी होऊन परतते. अनेक प्रसंगी ती खचून जाते, पण पुन्हा धैर्याने उभी राहते.

Women Cartoon World
Women Scheme : पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना 2024

डिस्नेची सगळ्यात अलीकडच्या नायिका म्हणजे ‘राया’ आणि ‘मिराबेल’. राया अॅण्ड द लास्ट ड्रॅगनमधली राया लढवय्या आहे. वाईट शक्तींचा सामना करण्यासाठी राया एकटीच हातात तलवार घेऊन ‘सिसू’ नावाच्या शेवटच्या ड्रॅगनच्या शोधात निघते.

विश्वासघात, वडिलांना गमावण्याचं दुःख, एकाकीपण या सगळ्यातून तावूनसुलाखून निघालेल्या रायाला कोणावरही विश्वास ठेवणं जड जातं. पण काही वेळा दुसऱ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच चांगल्या गोष्टी घडतात, हे ती शिकते आणि प्रेक्षकांनाही शिकवते.

एनकान्तोमधल्या मिराबेलचं माद्रिगाल कुटुंब अक्षरशः जादूई आहे. या कुटुंबातल्या सगळ्यांकडे काहीना काही खास शक्ती आहे. कोणी हवामानावर नियंत्रण मिळवू शकतं, तर कोणी शेप शिफ्टर आहे. अशा या कुटुंबाची नायिका मिराबेलकडे मात्र कोणतीही जादूई शक्ती नाही.

आणि विशेष म्हणजे, चित्रपटाच्या शेवटपर्यंत मिराबेल तशीच राहते. काही चमत्कार वगैरे होत नाही. मिराबेल काही फार सुस्वरूप वगैरे नाही, तिचा कोणी प्रियकरही नाही. जशा इतर सर्वसामान्य मुली असतात, तशीच ती एक. पण ही सर्वसामान्य मिराबेल कुटुंबावर निरपेक्ष प्रेम करायला शिकवते. कुटुंब हीच ताकद असते, हा धडा ती देऊन जाते.

टर्निंग रेड (२०२२) हा डिस्ने आणि पिक्सार स्टुडिओजचा आणखी एक चित्रपट. या चित्रपटाची नायिका ‘मे ली’ तेरा वर्षांची आहे. टिपिकल टीनएजर असणारी मे एकीकडे आईला आवडणार नाहीत अशा गोष्टी लपूनछपून करते आहे (बॉयबँडची गाणी ऐकणं, त्यांची पोस्टर जवळ ठेवणं वगैरे), पण तिला आईला नाराजही करायचं नाहीये.

त्यात भरीस भर म्हणून ती भावनिक झाली, की चक्क रेड पांडा होते. त्यावर तिचं नियंत्रण नाहीये. अशा चहुबाजूंनी अडकलेली मे सध्याच्या किशोरवयीन मुलांचं उत्तम प्रतिनिधित्व करते, आणि म्हणूनच ती रिलेटबल वाटते.

सिंड्रेलासारख्या नायिकांच्या व्यक्तिरेखांमधून दया, क्षमाशीलता, शांत वृत्ती यांसारखी मूल्य अभिप्रेत असायची. पण अलीकडच्या राया आणि मिराबेलसारख्या नायिका आधुनिक काळाशी सुसंगत मूल्यं शिकवतात; मेहनती व्हा, कुटुंबावर प्रेम करा, खचू नका, धैर्याने वाटचाल करा, विश्वास ठेवा, संकटांचा सामना करा!

-------------

Women Cartoon World
Reliance-Disney Merger : तब्बल 70,352 कोटी! रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटचं गणितच बदलणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com