बॉन्ड गर्ल्स । प्रसाद नामजोशी
जॉन ग्लेन दिग्दर्शित बॉन्डपटात आधी खलनायकाची मैत्रीण आणि मग बॉन्डच्या प्रेमात पडून त्याला मदत करणारी नायिका अशी या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणारी भूमिका मेरियम डाबोनं केली. तिनं केवळ संकटात सापडलेली नायिका साकारली नाही, तर आत्मभान असलेली स्त्री उभी केली!
ते वर्ष होतं १९८६. खुद्द जेम्स बॉन्डला अवघड जावी अशी कामगिरी बॉन्डच्या निर्मात्यांवर येऊन पडली होती. ती म्हणजे द लिव्हिंग डेलाइट्स या पंधराव्या बॉन्डपटातली बॉन्डची निवड! यापूर्वीचा जेम्स बॉन्ड म्हणजे रॉजर मूर सात वेळा बॉन्डपटात उंडारून आता साठीकडे झुकलेला होता. यापूर्वीचे आपले सात बॉन्डपट आणि त्यांच्या चित्रीकरणासाठी लागणारा तब्बल बारा वर्षांचा काळ अशी तपश्चर्या रॉजर मूरनं केली होती.
आता मात्र त्याला धन्यवाद म्हणून नवा बॉन्ड आणणं आणि रॉजर मूरऐवजी प्रेक्षकांनी त्याला स्वीकारणं ही अतिशय अवघड गोष्ट इऑन फिल्म्सचा निर्माता अल्बर्ट ब्रोकोलीच्या पुढे उभी ठाकली होती. खरंतर ही गोष्ट अतिशय सोपी ठरली असती, कारण टिमोथी डाल्टन हा अभिनेता जेम्स बॉन्ड म्हणून निर्मात्यांना आणि दिग्दर्शकालाही हवा होता. प्रत्यक्ष डाल्टनचं बॉन्डपटांविषयी काही बरं मत नव्हतं आणि आपली मतं तो जाहीरपणे व्यक्तही करत असे. त्यामुळे निर्मात्यांमध्ये त्याच्याविषयी जरा नाराजी होती. म्हणून मग बॉन्डच्या भूमिकेसाठी डाल्टन सोडून इतर अभिनेत्यांचा शोध सुरू झाला.