

Loneliness and Technology Addiction Youth
esakal
एकाकीपणा ही बरीचशी व्यक्तिनिष्ठ बाब आहे. म्हणजे एखादी व्यक्ती माणसांच्या गराड्यात असेल, पण तरीही तिला एकाकी वाटू शकतं. एखाद्या स्थिर नात्यात असतानासुद्धा एकटं वाटू शकतं. त्यासाठी प्रत्यक्षात एकटं असायला हवं असं नाही. आजच्या मुलांना या दोन्ही प्रकारे, दोन्ही आघाड्यांवर एकाकीपणाचा सामना करावा लागतोय, प्रत्यक्ष असलेला आणि अप्रत्यक्षरित्या जाणवणारा!
सुमित्राला तिच्या ऑफिससाठी एक प्रेझेंटेशन तयार करायचं होतं. त्यात तिला काही माहिती विशिष्ट प्रकारे द्यायची होती आणि ते कसं करायचं हे तिला कळत नव्हतं. नुकत्याच कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअर झालेल्या तिच्या मुलाच्या दारावर तिनं टकटक केली. तो त्याच्या मोबाईलवर चॅट करत होता. त्यानं नाइलाजानं मोबाईलमधली नजर काढून घेत तिच्याकडे बघितलं आणि तिला विचारलं, ‘‘काय गं?’’ ‘‘अरे मला जरा हे कसं करायचं सांग ना...’’ ‘‘गूगलवर सर्च कर ना! हजार व्हिडिओज मिळतील तुला.’’ सुमित्रा जरा गोंधळली. एकतर हा पर्याय तिच्या लक्षात आला नव्हता. आणि आपल्या घरात हे सगळं शिकलेला मुलगा आहे, तर त्याला विचारायचं हे तिच्या दृष्टीनं अगदी सरळ होतं. शिवाय त्यानिमित्तानं सदा स्वतःच्याच विश्वात असलेल्या आपल्या मुलाशी जरा बोलणं होईल, हा छुपा हेतूही होता त्यामागं. पण यातलं काहीच झालं नाही. कधी बरं त्याच्यासोबत आपल्या छान गप्पा झाल्या होत्या, तिला आठवेचना.