

Monsoon Fashion
esakal
वैष्णवी वैद्य-मराठे
पूर्वी पावसाळा या ऋतूसाठी वेगळ्या फॅशनचा फारसा विचार केला जात नव्हता, मात्र आज परिस्थिती बदलली आहे. पावसाळ्यासाठी स्वतंत्र वॉर्डरोब तयार करण्याकडे तरुणाईसह सर्वच वयोगटांचा कल वाढत आहे. फॅशन विश्वात रेनवेअर्स आणि रेनी डे लुक हा एक स्वतंत्र पैलू होत चालला आहे.
स गळीकडे पावसाला सुरुवात झाली असल्याने आता सगळ्यांच्याच पावसाळी गोष्टी बाहेर पडायला लागल्या असतील. पावसाळी फॅशन गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रचलित झाली आहे. पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ठेवणीतले रेनकोट आणि छत्र्या एवढंच बाहेर यायचं. पण आता ट्रेंडी, फॅशनेबल दिसतील आणि खास पावसाळ्यात वापरता येतील अशा विविध ॲक्सेसरीज बाजारात येऊ लागल्या आहेत.
लोकांची विशेषतः तरुणांची पावसाळ्यासाठीची तयारी काही दिवस आधी नाही, तर महिनोन््महिने आधीपासून सुरू होते. या तयारीमध्ये कपड्यांपासून बॅग्जपर्यंत आणि चपलांपासून मोबाईल कव्हर्सपर्यंत सगळ्याच बाबतीत आपला लुक स्टायलिश आणि ट्रेंडी कसा करता येईल, याकडे त्यांचे लक्ष असते.
जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. ऑफिसला जाणारे कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई, प्रवास करणारे, ट्रेकिंगप्रेमी किंवा लहान मुलांसाठीही खास डिझाईन केलेल्या पावसाळी वस्तूंना मोठी मागणी आहे. फॅशन, सुरक्षितता, सोय आणि टिकाऊपणा या चार गोष्टी लक्षात घेऊन ॲक्सेसरीजची निवड केली जाते.पावसाळ्यातील आवश्यक वस्तूंचे वर्गीकरण करून ही फॅशन समजून घेऊ या.