Monsoon Hair Care Tips: माझे केस खूप गळतायत, पावसामुळे असावे का?

monsoon hair care tips
monsoon hair care tipsSakal Saptahik

स्वप्ना साने

ऋतू बदलताना त्याचा आपल्या केसांवरही परिणाम होतो. पावसाळी, दमट हवामानात केस गळणे, तेलकट होणे, पुरळ येणे अशा समस्या उद्‍भवू शकतात. वेळीच काळजी घेऊन या समस्या नियंत्रणात ठेवता येतात.

मी २६ वर्षांचा आहे. डोळ्यांखाली डार्क सर्कल झाले आहेत. ते घालवण्यासाठी काय उपाय करता येईल?

उत्तर : तुम्हाला डार्क सर्कल कधीपासून आहेत? आणि चष्मा आहे का? कामाचे स्वरूप काय आहे? या गोष्टीही समजल्या असत्या तर नेमका काय उपाय करायचा, हे सांगता आले असते. असो, मी जनरल माहिती सांगते. त्यामुळे नेमकी काय कारणे असू शकतात आणि तुम्हाला कशामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल आले आहेत हे लक्षात येईल.

आय साईट वीक असल्यास, म्हणजे कमी दिसत असल्यास डोळ्यांवर ताण पडतो आणि त्यामुळे डोळे थकलेले दिसतात आणि डार्क सर्कल तयार होतात.

रात्री जागून अभ्यास केल्यास किंवा स्क्रीन बघत असल्यास डोळ्यांना जास्त त्रास होऊन डार्क सर्कल दिसतात.

तुमच्या कामामध्ये तुम्हाला सतत कॉम्प्युटर अथवा मोबाईल स्क्रीनकडे बघावे लागत असेल तर त्यामुळेसुद्धा डोळ्यांवर ताण पडतो. दृष्टीवर परिणाम होतो आणि डार्क सर्कल तयार होतात.

जेवणात पोषक तत्त्वांची कमतरता असेल, तर त्यामुळे वीकनेस येऊन काळी वर्तुळे तयार होऊ शकतात.

पाणी कमी प्यायल्यानेसुद्धा डोळे निर्जीव आणि थकलेले दिसतात आणि डार्क सर्कल दिसू शकतात.

याशिवाय, हार्मोनल इम्बॅलन्स असल्यास, रक्ताची कमतरता असल्यास, अथवा नुकतेच कुठले आजारपण होऊन गेले असेल तर त्यामुळेसुद्धा डार्क सर्कल होण्याची शक्यता असते.

डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील -

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहारात पूरक प्रमाणात व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी कॉम्प्लेक्स’, आयर्न यांचा समावेश असावा. त्यासाठी सफरचंद, पपई, गाजर, बीट, पालेभाज्या अन रानभाज्यांचा समावेश रोजच्या जेवणात असावा.

पाणी भरपूर प्यावे. शरीर डीहायड्रेट झाले की लगेच थकलेले जाणवते आणि त्वचा काळवंडते. त्यामुळे दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी जरूर प्यावे, पण तेही अंतरा-अंतराने.

घरगुती आय मास्क तयार करून लावल्यास त्याने फायदा होतो. बारीक कॉफी पावडर, बदाम तेल मिक्स करून डोळ्याभोवती लावावे आणि पंधरा मिनिटांनी धुऊन घ्यावे. बदाम तेलामुळे त्वचेला पोषण मिळते. ब्लॅक कॉफी तयार करून फ्रीजमध्ये गार करावी. त्यात कॉटन पॅड डीप करून ते डोळ्यांवर ठेवावे, १५ ते २० मिनिटांनी काढावे. लगेच फरक जाणवेल. असे तुम्ही दिवसातून दोन वेळेस करू शकता.

तसेच काकडीचे काप, बटाट्याचे काप हेसुद्धा गार करून २० मिनिटे डोळ्यांवर ठेवावे. डोळे फ्रेश होतात आणि डार्क सर्कलही कमी झालेले जाणवतात.

वापरलेल्या ग्रीन टी बॅग एका डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. वेळ मिळेल तसे दिवसभरात तीन वेळा तरी दहा-दहा मिनिटे डोळ्यांवर ठेवायच्या. फायदा होतो.

रात्री झोपायच्या आधी एखादे चांगल्या कंपनीचे आय सीरम लावावे किंवा नॅचरल बदामाचे तेल लावून हलका मसाज करावा.

वरील उपाय करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

प्रश्न : वातावरण दमट झाले, म्हणजे पाऊस सुरू झाला की माझे केस विचित्र दिसतात. मॅनेज होत नाहीत. शाम्पू केला तरी एक दिवस चांगले राहतात, नंतर दुसऱ्या दिवशी तेलकट होतात आणि फ्रेश वाटत नाहीत. टाळूवर बारीक पुरळही जाणवते. काय करावे?

उत्तर : दमट वातावरण असल्याने केस लवकर वाळत नाहीत. सारखा घामही येतो, त्यामुळे केस तेलकट दिसायला लागतात आणि शाम्पू केल्यावर तेवढ्या वेळापुरते फ्रेश दिसतात, नंतर परत खराब होतात. अनेकांना आर्द्रतेमुळे आणि टाळू ओलसर राहिल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत फंगल इन्फेक्शन किंवा बारीक पुरळ येऊन खाजणे हासुद्धा त्रास सुरू होतो. त्यामुळेच केसांना एक प्रकारचा वास यायला लागतो. त्यात जर त्वचा तेलकट असेल, तर केस लवकरच खराब दिसतात.

अशा वेळी केसांना हर्बल आणि अँटिफंगल टी ट्री ऑइल किंवा शिकेकाई-आवळायुक्त माइल्ड शाम्पू वापरावा. एक दिवसाआड शाम्पू करावा. बारीक पुरळ येत असेल तर त्यासाठी आठवड्यातून एकदा हेड मसाज करावा. त्यासाठी ॲलोव्हेरा जेलमध्ये इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब घालावेत; जसे रोझमेरी ऑइल, लव्हेंडर ऑइल, अथवा टी ट्री ऑइल. हे तेल चांगले मिक्स करून टाळूला हळुवार मसाज करावा. असे केल्यास केसांना पोषण तर मिळतेच, पण छान सुगंधही येतो. एका स्प्रे बॉटलमध्ये रोझ वॉटर घेऊन त्यात इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब टाकावेत. केस पूर्ण वाळत आले की हलकेच हे सोल्यूशन केसांवर स्प्रे करावे. दिवसभर छान सुगंधित आणि फ्रेश वाटेल.

केस खूप दाट असतील आणि लवकर वाळत नसतील, तर तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. फक्त वारंवार आणि खूप जास्त हाय हीटवर त्याचा उपयोग करू नये, केस डीहायड्रेट होतात.

प्रश्न : माझे केस खूप गळतायत. सीझन चेंजमुळे असावे का?

उत्तर : सीझन चेंज झाला की आपल्या शरीरातही बदल होत असतात. त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवरही होतो. आर्द्र वातावरण असल्यामुळे सतत घाम येतो, केस ओलसर आणि चिपचिप होतात, पूर्ण कोरडेही होत नाहीत, त्यामुळे ते तुटतात. या सीझनमध्ये केसांची नीट काळजी घ्यावी लागते. खोबरेल तेलाने मसाज करावा आणि हर्बल शाम्पू वापरून केस धुवावेत. तेलकट केस जास्त खराब होतात. घाम, ऑइल आणि ह्युमीडिटीमुळे केस डल दिसायला लागतात. अशावेळेस एक दिवसाआड शाम्पू करावा. ऑइल मसाज नाही केला तरी चालेल, पण स्काल्प क्लीन असावा. केस जर जास्त वेळ ओले राहिले, तर नंतर घाम आणि अतिरिक्त स्किन ऑइलमुळे इन्फेक्शन होऊन केस गळती होऊ शकते.

तुम्हाला जर नुकतेच व्हायरल इन्फेक्शन होऊन गेले असेल, तर त्यामुळेसुद्धा हेअर फॉल होऊ शकतो.

केसांची काळजी घेताना आहाराकडे लक्ष द्यावे. भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन ‘बी’, ‘सी’, आणि ‘डी’युक्त आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्यावी. व्यायाम नियमित करावा आणि पाणी भरपूर प्यावे.

(सौजन्य : साप्ताहिक सकाळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com