

Monsoon Pet Care
esakal
डॉ. सुनील रामकृष्ण देशपांडे
‘नेमेची येतो मग पावसाळा’ हे खरेच आहे. पाऊस येणारच, आणि आजारपण घेऊनच येणार. मग आपण आपल्या पाळीव प्राण्यांना आणि पक्ष्यांना शक्य तितके जपावे. आजारांपासून, अशक्तपणापासून दूर ठेवावे. काळजी ‘करू’ नये, पण काळजी ‘घ्यावी’!
उशिरा का होईना, यावर्षीचा पावसाळा सुरू झाला. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वातावरणही आल्हाददायक झालेले आहे. पावसाने माणूस आणि प्राणी दोघांच्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित होत असल्या, तरी अशा वातावरणात पावसात भिजल्यामुळे, गारठ्यामुळे मनुष्यप्राण्याच्या आणि पाळीव प्राण्यांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो. पावसाचे दर्शन म्हणजे जणू रोगजंतू वाढीचा सुकाळ अशी जीवाणू-विषाणू-परजीवींची अवस्था होते. त्यांची संख्या आणि कारवाया या मोसमात वाढतात.
पावसाळा उष्णतेपासून दिलासा देत असला, तरी पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी तो अनेक नवी आव्हानेही घेऊन येतो आणि या आव्हानांकडे योग्य प्रकारे लक्ष न दिल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका संभवतो. पावसाळ्यात आपली स्वतःची आणि कुटुंबीयांसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी काय काय करावे लागेल ते पाहू या.