सुवर्णा चिटणीस
कैरोला मला दोन गोष्टी जरा वेगळ्या वाटल्या. एक म्हणजे सगळी घरं अर्धवट बांधलेली दिसत होती आणि त्यांना बाहेरून सिमेंटचा गिलावा अजिबात नव्हता, त्यामुळे इमारतींना रंग नव्हताच. फक्त विटांच्या भिंती. तिथे पाऊसच नाही त्यामुळे बाहेरून गिलावा नाही केला तरी चालतं. दुसरं म्हणजे मेन रोडला बहुतेक ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलच नाहीत. फक्त यू-टर्न आहेत, पण तरीही ट्रॅफिक सुरळीत सुरू असतं.
प्राचीन संस्कृतीची, इतिहासाची, भव्यतेची आवड आहे त्यांनी इजिप्त हा देश जरूर बघावा. मला इतिहासाची फारशी आवड नसल्यामुळे आणि इजिप्तमध्ये फक्त पिरॅमिड्स आणि त्यात ठेवलेल्या ममीज तर आहेत असं समजून इजिप्तला जायचं नाही असंच मी ठरवलं होतं. पण आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळंच! मैत्रिणींनी आग्रह केल्यामुळे मी इजिप्तला जायला तयार झाले आणि आपली समजूत किती चुकीची होती हे लक्षात आलं!