

Trekking spots near Khopoli and Pali
esakal
मयुरेश मांजरे
कातळखिंड चढून वर गेल्यानंतर दोन वाटा समोर आल्या. एक वाट सरळ मृगगडावर नेणारी होती, जिथं कातळातच कोरलेल्या जुन्या पायऱ्या दिसत होत्या. दुसरी वाट मात्र थोडी वेगळी होती. किल्ल्याचं दुसर ॲडव्हेंचर होती ती म्हणजे मृगगडाची गुहा! या गुहेकडे जाणारी वाट अतिशय अरुंद होती, इतकी की एकावेळी एकच पाय ठेवायला जागा होती. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी...!
मृगगड... रायगड जिल्ह्यातलं सुधागड तालुक्यातल्या पालीजवळ लपलेलं रत्न. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा छोटेखानी किल्ला फारसा प्रसिद्ध नाही, पण निसर्गसौंदर्य, शांतता आणि साहस अशा सगळ्यांचा परिपूर्ण संगम इथं अनुभवता येतो. कारतलाब खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंबरखिंडीच्या लढाईत या किल्ल्याचा विशेष उपयोग झाला असला तरीही या किल्ल्याबद्दलचा इतिहास फारसा प्रसिद्ध नाही. गर्दी नसलेला पण इतिहासाचा व निसर्गाचा स्पर्श लाभलेला असा मृगगड एकदातरी अनुभवायलाच हवा.