

Madhubala Legacy
esakal
सुलभा तेरणीकर
सिनेसृष्टीच्या भुलभुलैय्यात काही अपेक्षाभंगाची रहस्यं लपलेली असली, तरी भारतीय रसिक लोकशाहीचं अस्तित्व सिद्ध करतात. पुरस्काराचा आदर करूनही रसिक मुग़ल-ए-आज़मचा अभिमान मिरवतात. मुग़ल-ए-आज़मची तमिळ आवृत्ती स्वीकारली गेली नाही याची खंत करत नाहीत, की इंग्रजी आवृत्तीचा ठावठिकाणा नाही याची फिकीर करत नाहीत. कोणतेही पुरस्कार न मिळालेली मधुबाला रसिकांनी आजही हृदयात जपलेली आहे.
स न १९६०पासूनची सिनेमा डायरी पाहिली तर चकवा लागतो! मुग़ल-ए-आज़ममधली ‘अनारकली’ मधुबाला बरसात की रातमध्ये एका पावसाळी रात्रीतली रहस्यमय जादू होते. जिस देश में गंगा बहती हैची पद्मिनी पाण्यात आग लावते जणू! दिल अपना और प्रीत पराईमधली ‘श्वेतांबरा’ मीना कुमारी कसलीशी कहाणी सांगते. सत्यजित रे यांच्या देवीमधली शर्मिला टागोर चटका लावते, तर अवघाचि संसारमधली जयश्री गडकर रसिकांना ‘रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणांना...’ असं गुणगुणायला लावते. भारतीय रसिक पुरते सिनेमामय होतात.
एका तपाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर के. आसिफ यांनी मुग़ल-ए-आज़म हा भव्य, बहुचर्चित आणि बहुखर्चिक चित्रपट पूर्ण केला. मुघल साम्राज्याचं वैभव दाखवलं. शीश महल, मधुबालाचं आजारपण, दिलीप कुमारसोबतचे तिचे मतभेद असे अनेक अडथळे पार झाले, आणि अखेर ५ ऑगस्ट १९६० या दिवशी हत्तीवरून वाजत गाजत फिल्म प्रदर्शित करण्यात आणली. इतिहास रचला गेला! पण आठव्या फिल्मफेअर समारंभात सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून मुग़ल-ए-आज़मला पुरस्कार मिळूनही के आसिफ नाराज झाले. कारण सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार दिलीप कुमार यांना कोहिनूरसाठी मिळाला आणि घुंगट चित्रपटातल्या भूमिकेसाठी बीना रॉय यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार. सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला दिल अपना और प्रीत पराई चित्रपटाला संगीत दिलेल्या शंकर जयकिशन यांना. श्रेष्ठ गीतकार ठरले शकील बदायुनी, चौदहवीं का चाँद या चित्रपटातल्या गीतांसाठी. संगीतकार नौशाद यांनी मुघलकालीन घरंदाज संगीतासाठी अविश्रांत मेहनत केली होता. उस्ताद बडे गुलाम अली खान यांना तानसेनसाठी राजी केलं होतं. लता मंगेशकरांसाठी पैगंबर स्तुतीची रचना केली होती. ‘बेकस करम कीजिये सरकार-ए-मदीना...’, कथक नृत्यशैलीचं प्रदर्शन झालेलं ‘मोहे पनघट पे नंदलाल’, शीश महलचं ‘प्यार किया तो डरना क्या’... लतादीदींना वाटत होतं परखच्या संगीताला पुरस्कार मिळावा.
सिनेसृष्टीच्या भूलभुलैय्यात अशा काही अपेक्षाभंगाची रहस्यं लपलेली असली, तरी भारतीय रसिक लोकशाहीचं अस्तित्व सिद्ध करतात. पुरस्काराचा आदर करूनही रसिक मुग़ल-ए-आज़मचा अभिमान मिरवतात. मुग़ल-ए-आज़मची तमिळ आवृत्ती स्वीकारली गेली नाही याची खंत करत नाहीत, की इंग्रजी आवृत्तीचा ठावठिकाणा नाही याची फिकीर करत नाहीत. कोणतेही पुरस्कार न मिळालेली मधुबाला रसिकांनी आजही हृदयात जपलेली आहे. हाच मोठा पुरस्कार असतो.