

Nabhaay and Damodar Kaka
esakal
शारदा येईपर्यंत नभय घरी एकटाच असायचा. घरापासून काही अंतरावरच दामोदर काकांचं टेलरिंगचं दुकान होतं. नभयच्या मनात त्यांची मदत घेण्याचा विचार आला. पण सरळ मदत मागायची कशी? ते त्यांचा कामधंदा सोडून नभयसाठी कशाला इतकं करतील? त्यासाठी त्याला काहीतरी करणं भाग होतं. काय करावं या विचारात तो त्यांच्या दुकानाबाहेर एका कोपऱ्यावर बसून त्यांचं निरीक्षण करू लागला.
शारदा रूपलच्या घरी सर्वात शेवटी आली होती. त्याच सोसायटीमध्ये ती अजून चार-पाच घरची धुणीभांडी करायची. कुठूनतरी तिला समजलं, की रूपलचं काहीतरी बिनसलं होतं. उगाच आपला दिवस खराब नको जायला, म्हणून ती इतर घरांची कामं आटपून रूपलच्या घरी आली होती.
शारदा एका चाळीत आपल्या सोळा-सतरा वर्षांच्या मुलासोबत राहायची. नवऱ्यानं टाकलेली शारदा लोकांच्या घरी धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवत होती. शारदा स्वभावानं शांत, प्रेमळ आणि मनमिळावू होती. तिच्या कामात टापटीपपणा असायचा. त्यामुळे सोसायटीतले बरेच लोक तिच्याकडून वरचेवर काम करून घेत असत, त्या बदल्यात तिला मोबदलाही मिळायचा.
रूपल एका बड्या अधिकाऱ्याची बायको होती. तिच्या चेहऱ्यावरून आणि वर्तणुकीतून तिच्या श्रीमंतीचा माज झळकायचा. इतर लोकांशी ती जरा फटकूनच वागायची. इतरांना कमीच लेखायची. म्हणून शारदा तिच्याशी जेवढ्यास तेवढं वागायची. या मोठ्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आपण बरं आणि आपलं काम बरं. शारदाच्या गरीब स्वभावामुळे ती बहुतांशी रूपलच्या हेकेखोर स्वभावाला बळी पडायची.