

Evolution of Indian Education Policies Since 1986
esakal
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे केवळ शिक्षणातील तांत्रिक बदलांचा दस्तावेज नाही, तर शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांचा पुनर्विचार करणारा व्यापक प्रयत्न आहे. शिक्षणाला पाठांतर, परीक्षा आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीतून बाहेर काढून व्यक्तिमत्त्व विकास, विचारकौशल्ये, व्यवसाय शिक्षण, भारतीय ज्ञानपरंपरा आणि जीवनाभिमुखतेशी जोडण्याचा प्रयत्न या धोरणात दिसतो. अर्थात कोणतेही धोरण केवळ कागदावर यशस्वी होत नाही, त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, समाजाची मानसिकता, शाळांची तयारी आणि अंमलबजावणीची सातत्यपूर्ण प्रक्रिया अत्यावश्यक असते.
इतिहास सांगतो, की योग्य शिक्षणामुळे महान व्यक्ती घडल्या, समाज संघटित झाले आणि राष्ट्रे उभी राहिली. शिक्षणाने माणसाला केवळ कुशल कामगार म्हणून घडवले नाही, तर सजग नागरिक, संवेदनशील समाजघटक आणि राष्ट्रासाठी समर्पित व्यक्ती घडवल्या. पण आज शिक्षणाची सद्यःस्थिती काय दर्शवते? शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन मानण्याइतपत आपण संकुचित झालो आहोत. एका बाजूला स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘शिक्षण म्हणजे मनुष्यातील उत्तमतेचे प्रकटीकरण’! तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा हेतू अक्षरओळख, संख्याज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्यांपुरता मर्यादित केला जातो. तरीही सगळ्यांना रोजगार मिळतो का, हा मुद्दा अलाहिदा! या दोन्ही टोकांमध्ये शिक्षणाचा व्यापक अर्थ हरवत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० हा केवळ नवीन अभ्यासक्रमाचा दस्तावेज नसून, तो शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टीच बदलण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक शिक्षणशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा समन्वय या धोरणात साधला गेला आहे. या धोरणामुळे शिक्षण माहितीप्रधानतेकडून जीवनाभिमुखतेकडे जात असल्याची स्पष्ट दिशा दिसते आहे.