आरती गोखले
हृदय हा शरीरातील केवळ एक अवयव नाही, तर ते मानवी भावविश्वाचे केंद्र मानले जाते. हृदयाची धडधड थांबते त्याक्षणी माणसाचा मृत्यू होतो. पण तेच हृदय दान केल्यानंतर दुसऱ्याच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होते. अशा वेळेस आपण एका कुटुंबाला दुःखातून सावरतो आणि दुसऱ्या कुटुंबाला आयुष्याचा नवा सूर देतो... अवयवदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हृदय ‘विशाल’च असते आणि तेच हृदय समाजाला एकात्मतेच्या नव्या धाग्यात गुंफते...
पृथ्वी म्हणजे मृत्युलोक, असे मानले जाते. येथे जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू अटळ आहे. पण, आधुनिक काळात पृथ्वीवर ‘अवयवरूपी’ उरण्याची नवी उमेद देणारा विचार म्हणजे अवयवदान! अवयवदान म्हणजे मानवाने दुसऱ्या मानवाला केलेल्या सहकार्याची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या हृदयाचा ठोका थांबल्यानंतरही दुसरे हृदय त्या व्यक्तीच्या छातीत पुन्हा धडधडू शकते. आणि आपण आपली प्रिय व्यक्ती गमावली असली तरी ती अवयवरूपाने दुसऱ्या व्यक्तीमध्ये जिवंत आहे, ही कल्पनाच या सर्वोत्कृष्ट अभिव्यक्तीमागील मुख्य ऊर्जास्रोत आहे. अवयवरूपाने आपला प्रिय माणूस या जगात वास्तव्य करीत असल्याची भावना मनाला खोलवर दिलासा देणारी असते.