
सुवर्णा चिटणीस
नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडची ट्रिप करायची ठरवली आणि जुलैमध्ये बुकिंगही केलं. पण बुकिंग केल्यानंतर मला एक छोटासा अपघात झाला आणि ऑपरेशन करावं लागलं. मग त्यानंतर सक्तीची विश्रांती! त्यामुळे जायचं की नाही या द्विधा मनःस्थितीत असताना शेवटी डॉक्टरांनी परवानगी दिली!
ठरलेल्या तारखेला आमची स्वारी मुंबई विमानतळावर पोहोचली. चेक इनच्या रांगेत उभं असतानाच काउंटरवरच्या माणसानं सांगितलं, की रात्री सव्वाअकराची फ्लाइट लेट झाली आहे आणि ती रात्री सव्वादोनला निघेल.
तसंच पुढची क्वालालंपूरहून सकाळी ८ वाजता निघणारी फ्लाइटही रद्द झाली होती. पर्याय तर नव्हताच. सकाळी सातला पोहोचणारी फ्लाइट दहाला पोहोचली. तिथे उतरल्यावर मलेशिया एअरलाईन्सच्या लोकांची धावपळ सुरू झाली. दुसऱ्या दिवशीच्या फ्लाइटमध्ये केवळ काहीजणांचीच सोय होईल, सर्व ग्रुपची होणार नाही, असं कळलं.
असं करत करत शेवटी दुपारी चार वाजता आम्हाला एअरपोर्टवरून बाहेर पडून मलेशियात राहण्यासाठीचा स्पेशल पास मिळाला. तिथून आमची रवानगी हॉटेलमध्ये झाली. आमच्याकडे दुसरा संपूर्ण दिवस होता, कारण मलेशियाहून रात्री निघणाऱ्या फ्लाइटमध्ये आमची सोय झाली होती.