

Maharashtra Health Challenges
esakal
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस-६) ताज्या आकडेवारीने भारताच्या आरोग्यव्यवस्थेतील बदलांचा महत्त्वाचा आरसा समोर ठेवला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या सर्वेक्षणात देशातील सुमारे ६.७९ लाख कुटुंबांचा समावेश करण्यात आला. मागील सर्वेक्षणाशी तुलना करता मातृ-बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण आणि आरोग्य सुविधांच्या बाबतीत देशाने प्रगती केली आहे. मात्र त्याचवेळी लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
महाराष्ट्राचे चित्र या राष्ट्रीय बदलाचे जवळपास अचूक प्रतिबिंब आहे. एका बाजूला बालकांमधील खुंटलेली वाढ कमी झाली आहे, घरांमध्ये वीज आणि सुधारित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढली आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रौढांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तशर्करा आणि उच्च रक्तदाबाची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोर आता केवळ ‘कुपोषणमुक्त महाराष्ट्र’ करण्याचे आव्हान नाही, तर ‘जीवनशैलीजन्य आजारांपासून मुक्त महाराष्ट्र’ करण्याचेही आव्हान आहे. महाराष्ट्रातील पाच वर्षांखालील मुलांमधील खुंटलेल्या वाढीचे प्रमाण ३५.२ टक्क्यांवरून २९.५ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच सुमारे ५.७ टक्क्यांची सुधारणा झाली आहे.