

Night Blooming Flowers
esakal
डॉ. मंदार दातार
आताच्या काळात आपल्या आसपासच्या परिसरात आपण नजर फिरवली, तर हा हिरव्याच्या पार्श्वभूमीवरचा पांढऱ्या रंगाचा पुष्पसंभार काही विरळा प्रकार नाही. अनेक वनस्पती हाच मार्ग धरतात. आपली आषाढराणीसुद्धा अशीच. दिवसा हा ग्रीन कॉन्ट्रास्ट डोळ्यांना सुखावतो. पण हा तामझाम ना आपल्यासाठी आहे, ना दिवसा उठून दिसण्यासाठी. हा ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू आहे निशाचर पतंगासाठी किंवा मॉथसाठी.
‘वो कागज़ की कश्ती, वो बारिशका पानी’ या सहा शब्दांत कवी सुदर्शन फ़ाकिरांना असं काही साधून गेलंय, की कोणीही या ओळी ऐकल्या, तरी त्याला आपल्या लहानपणाची काही स्मरणे खुणावतीलच. ही रचना ऐकली, की माझंही असंच काहीसं होतं. माझं लहानपण नायगाव नावाच्या एका नितांत सुंदर गावात गेलं. भरपूर पावसाचा भोर तालुक्यातला हा मुलूख. आमचं घर भलंमोठं व पत्र्याचं होतं. रात्रभर पावसाचा ताशा पत्र्यावर वाजत असे. घराच्या एका बाजूला वाहणारा ओढा आणि दुसऱ्या बाजूला भातखाचरांत असणारा गावाच्या अगदी वरच्या टोकापासून वाहत येऊन ओढ्याला मिळणारा एक पावसाळी ओहोळ.