संजीव शहा, साधना शहा
रोवानिमीपासून आठ किलोमीटर अंतरावर चक्क ‘सांताक्लॉजचं गाव’ आहे. त्याच्या गावाच्या बरोबर मधून ‘आर्क्टिक सर्कल’ या आर्क्टिक प्रदेशाची काल्पनिक सीमारेषा जाते, जी इथं पांढऱ्या रंगानं आखलेली आहे. त्या रेषेच्या अलीकडे युरोप, आणि पलीकडे पाऊल ठेवलं की आर्क्टिक प्रदेश. सांताक्लॉजच्या या गावात त्याचं ऑफिसही आहे, तिथं त्याच्या नावानं जगभरातून पत्रं येतात.
गेल्यावर्षी जपान आणि ओकिनावा ही सर्वाधिक दीर्घायुष्य लाभलेल्या लोकांची बेटं पाहण्यासाठी गेलो होतो. यावर्षी आणखी एक वेगळं जग पाहण्याचा विचार करत असताना लहानपणी वाचलेल्या बर्फाळ प्रदेशाची, रेनडिअरच्या गाड्यांची, हिमअस्वलांची आठवण झाली आणि बराच अभ्यास करून आम्ही उत्तर युरोपात जाण्याचं ठरवलं.
फिनलंड, इस्टोनिया, स्वीडन आणि नॉर्वे हे चार देश आम्ही निवडले. फिनलंड हा स्कँडेनेव्हियन किंवा नॉर्डिक देश. याच्या पूर्वेला रशिया, उत्तरेला नॉर्वे, वायव्येला स्वीडन आणि दक्षिणेला फिनलंडच्या आखाताच्या पलीकडे इस्टोनिया, अशी आमची सफर ठरली.