आपल्या देशात नाट्यशास्त्र/ अभिनय/ दिग्दर्शन व इतर तांत्रिक बाबी शिकविणाऱ्या बऱ्याच संस्था आणि विद्यापीठांअंतर्गत विभाग कार्यरत आहेत. या संस्थांच्या अभ्यासक्रमांपेक्षा उजवा ठरणारा व विशिष्ट स्वरूपाची गुणवत्ता आणि दर्जा असलेला अभ्यासक्रम, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे सुरू करण्यात आला आहे.
डिप्लोमा कोर्स इन ड्रामॅटिक्स आर्ट्स
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे अर्थसाहाय्य लाभले आहे. संस्थेच्यावतीने तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स इन ड्रामॅटिक आर्ट्स हा अभ्यासक्रम चालविला जातो. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा आणि पूर्णकालीन आहे. या अभ्यासक्रमात अभिनय, डिझाईन आणि रंगमंचाशी निगडित इतर विषयांचे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाते.