बॉन्ड गर्ल्स । प्रसाद नामजोशी
बॉन्ड गर्ल साकारून पुढे काहीच करू न शकणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आपल्या नावाची भर घालायची नाही, असं ओल्गानं ठरवलं होतं की काय, असं वाटावं अशा झपाट्यानं ओल्गानं पुढचे चित्रपट केले. २०१२मध्ये टेरेन्स मॅलिकच्या टू द वंडरमध्ये बेन ॲफ्लेक आणि रेचल मॅकॲडम्सबरोबर आणि २०१३मध्ये जोसेफ कोसिन्स्की दिग्दर्शित ऑब्लिव्हियनमध्ये टॉम क्रूझसोबत तिनं काम केलं. शिवाय जॉनी इंग्लिश स्ट्राइक्स अगेन, सेव्हन सायकोपॅथ्स, ब्लॅक विडो, द मॅन हू किल्ड डॉन क्विटो, द देथ ऑफ स्टॅलिन असे अनेक गाजलेले चित्रपट तिच्या नावावर आहेत.
युक्रेनच्या नट-नट्यांनी हॉलिवूडमध्ये काम करणं ही काही तशी नवी गोष्ट नाही. युक्रेनची मंडळी तर अगदी लिओनार्डो डिकॅप्रिओची आजी कशी मूळची युक्रेनची होती, मग ती तिथून जर्मनीला कशी पळून गेली आणि तिथून तिची मुलगी कशी अमेरिकेत गेली आणि हा लिओ तिचा मुलगा म्हणजे कसा आमचाच खरा याच्या बढाया मारतात. पण सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेनमध्ये जन्मलेल्या एका मुलीनं पुढे चक्क बॉन्डपटात काम करणं हे राजकीयदृष्ट्या आजच्या रशियाला आवडणारं नव्हतंच. कारण मुळात दहातल्या साडेदहा बॉन्डपटात जेम्स बॉन्ड कुठल्यातरी रशियन गुप्तहेराची धुलाई तरी करत असतो किंवा रशियाच्या खलनायकाचे मनसुबे तरी खतम करत असतो.
अशा परिस्थितीत ओल्गा कुरिलेन्कोनं क्वांटम ऑफ सॉलेसमध्ये बॉन्ड गर्ल व्हावं आणि ब्रिटिश गुप्तहेराची मदत करावी यानं रशियात खळबळ उडालीच. एवढी की रशियन राजकीय नेते सर्गे मालिन्कोविचनं तिला खुलं पत्र लिहिलं आणि सर्व कम्युनिस्टांच्यावतीनं तिचा निषेध केला. ‘जेव्हा सोव्हिएत युनियननं तुला फुकट शिक्षण दिलं, फुकट वैद्यकीय सेवा दिली तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं, की एक दिवस तू हजारो रशियानांची सरसकट हत्या घडवणाऱ्या बॉन्डपटात जेम्स बॉन्डच्या बरोबरीनं काम करून त्यांना दगा देशील,’ हे त्यांचे शब्द होते.