
रमेश पाटणकर
नवीन पिढीचा कलही संस्कारांकडेच वळतोय. ही पिढी खूप पुढचा विचार करतेय. पूर्वीच्या लग्नातलं ‘वाजंत्री बहु गलबला न करणे’ हे तत्त्व त्यांनी नेमकं उचललंय. त्यांना संस्कार हवेत, पण अर्थांच्या अनुभवासह. हौस हवी आहे, पण धावपळ न करता. कौतुक हवंय, पण दिखाऊपणा न करता.
“तुला सांगतो, लग्न कसं करावं, हा न संपणारा विषय आहे. तरीही सीतेचं स्वयंवर असू दे, किंवा सोसायटीतल्या अर्चितेनं केलेलं कोर्ट मॅरेज असू दे, सगळी लग्नं सारखीच,” गुरुजी पूजा सांगावी तसे एका लयीत बोलत होते. या गुरुजींनी माझ्या बारशापासून ते आमचा मुलगा शार्दूल आणि मुलगी शार्वी या दोघांच्याही मुंजींपर्यंत सगळी कार्यं केली होती.
मी, ही, शार्दूल आणि शार्वी असे चार हक्काचे श्रोते त्यांचं हे लग्नपुराण ऐकत होतो. गुरुजी शार्वीच्या लग्नाचा मुहूर्त काढायला म्हणून घरी आले होते. ‘तुला सांगतो’ने सुरू होणारं प्रत्येक वाक्य या घरगुती चर्चासत्राला वादविवाद स्पर्धेकडे घेऊन जात होतं.
कारण श्रोत्यांपैकी मी आणि ही कशालाही ‘मम’ म्हणणारे; तर शार्दूल, शार्वी सगळ्यालाच ‘इदं न मम’ म्हणणाऱ्या पिढीचे. मोठ्यांना प्रश्न विचारायचा नाही, हे अंगी बाणवलेली आमची पिढी आणि मोठ्यांना निरुत्तर करण्यात धन्यता मानणारी ही पुढची पिढी. पारा वाढत चालला होता.
अखेरीस एका ‘तुला सांगतो’ला तोडत शार्वीने यॉर्कर टाकलाच. “पण आमचं छान जुळलेलं असताना मुहूर्त, पत्रिका बघायची गरजच काय?”