
डॉ. प्रशांत मुंडे
ऑस्टिओपोरोसिस हा दबक्या पावलांनी येणारा आजार आहे. रजोनिवृत्तीनंतर याचा धोका अधिक असतो. पाठदुखी किंवा थोड्याशा धक्क्यानंही फ्रॅक्चर होणं ही त्याची गंभीर लक्षणं. पण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळच्यावेळी अचूक निदान यामुळे या झिजलेल्या हाडांना बळ देता येऊ शकतं. हाडांची काळजी ही केवळ वृद्धांपुरती मर्यादित नसून, ती तरुण वयातच सुरू झाली पाहिजे.
आजीला उगाचच काही न करता कमरेत वेदना झाली, आईला खाली वाकून वस्तू उचलण्याचं निमित्त काय झालं आणि हात फ्रॅक्चर झाला किंवा आजोबांचा घरात चालताना पाय घसरला नसूनही अचानक हाड मोडलं... अशा घटना आपल्या घरात किंवा शेजारीपाजारी अनेक वेळा घडताना दिसतात. हे केवळ अपघात नसतात, तर त्यांच्या मुळाशी असतो एक मूक आजार. त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणे. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि सहज मोडण्याचा धोका वाढतो. अनेकदा ऑस्टिओपोरोसिसची सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. पण हा आजार पुढे वाढत जातो. म्हणूनच त्याला ‘सायलेंट डिसीज’ असंही म्हटलं जातं. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिसचा धोका अधिक प्रमाणात दिसून येतो.