

cinema trend in India
esakal
चित्रपट हे मोठ्या पडद्याचे माध्यम आहे, हे निर्विवाद सत्य आहेच. मात्र, कोरोनानंतरच्या काळात हातपाय पसरलेल्या ‘ओटीटी’ या माध्यमासाठी स्वतंत्र अशी चित्रपटनिर्मिती करण्याचा ‘ट्रेंड’ही गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्याचे दिसते. चित्रपटगृहातील सिनेमा आणि ओटीटीसाठीचा सिनेमा असे दोन प्रकार आपल्याकडे आहेत. आधी चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करून नंतर तो ओटीटीवर येत आहेच. मात्र, खास ओटीटीसाठी चित्रपटनिर्मिती वाढत आहे. गेल्या काही वर्षांत प्रेक्षकप्रिय होत असलेल्या ‘ओटीटी सिनेमा’च्या युगाबद्दल...
मनोरंजनाचा मूळ हेतू कायम ठेवून वेगवेगळ्या काळामध्ये सिनेमानिर्मितीच्या रचनेत तत्कालीन परिस्थितीनुसार बदल होत गेले. प्रेक्षकांना नक्की काय आवडेल, नक्की काय आपलेसे वाटेल असा कोणताही ठोस ‘फॉर्म्युला’ अद्याप सापडलेला नसला, तरीही निर्मितीच्या पातळीवर विविध प्रयोग आणि बदल होत गेले. मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर हिंदी चित्रपटांचा आशय-विषय बदलला. ‘मल्टिप्लेक्स कल्चर’ रुळायला लागल्यावर एका विशिष्ट स्वरूपाचा ‘लो बजेट’ सिनेमाही आपल्याकडे वाढला. हा बदल अर्थातच अगदी गेल्या २५ वर्षांतला. मात्र, कोरोनाचे संकट येण्यापूर्वी भारतात ‘ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिसेस’ अर्थात ‘ओटीटी’चा काळ सुरू झाला. मनोरंजनासाठी नाट्यगृह, चित्रपटगृहांवर अवलंबून राहायचे दिवस इतिहासजमा झाले. अगदी अनेक आठवड्यांचे विक्रमही इतिहासाच्या पुस्तकात जाऊन बसले. इंटरनेटचे विश्व विस्तारले आणि तुमच्या-आमच्या आयुष्यातली मनोरंजनाची समीकरणेच बदलली. स्वस्त डेटा प्लॅन मिळू लागले आणि इंटरनेट घराघरांत पोहोचले. अशा वेगळ्या माध्यमाची सुरुवात आपल्याकडे त्यापूर्वी खूप आधी झाली होती आणि त्याला ओटीटी हे नाव देण्यापूर्वी ते आपल्याकडे आले होते. रिलायन्स एंटरटेनमेंटने २००८मध्ये सुरू केलेला पहिला भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म ‘बिगफ्लिक्स’ होता. सन २०१०मध्ये डिजीव्हने ‘नेक्सजीटीव्ही’ नावाचे भारताचे पहिले ओटीटी मोबाईल अॅप लाँच केले. नेक्सजीटीव्ही हे स्मार्टफोनवर इंडियन प्रीमियर लीग सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणारे पहिले अॅप ठरले. साधारण २०१३-१४ या वर्षांत त्यांची चर्चा होती. मात्र, त्यानंतर ‘नेटफ्लिक्स’, ‘ॲमेझॉन’, ‘डिस्ने’ यांसारखे विदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्स देशात येण्यास सुरुवात झाली होती.