इरावती बारसोडे
आता फक्त एकच मांजर आहे, या विचारात आम्ही गाफील असतानाच आमच्या पाळणाघरात नवी पिल्लावळ येऊन दाखल झाली, त्यांच्या आईसह. टिंगी तिची पिल्लं घेऊन आली - दोन सोनेरी फर बॉल्स! ती तिची पहिलीच पिल्लावळ असावी.
माझे आई-बाबा, बहीण सगळ्यांनाच मांजरांची (आणि कुत्र्यांचीही) आवड. आमचं हे मांजरप्रेम मांजरींनी ओळखलं, आणि आमचं घर मांजरांचं पाळणाघर कधी झालं ते आमचं आम्हालाच कळलं नाही.
मांजरांच्या पाळणाघराच्या पहिल्या ब्रांचची सुरुवात बहुधा कोल्हापुरातच झाली. कोल्हापूरच्या घरात, स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेर एक झाड होतं. खिडकीतून त्या झाडाचा फक्त शेंडा दिसायचा. तो शेंडा एकदम गदागदा हलायला लागला की आम्ही समजून जायचो, माऊच्या पिल्लावळीचं आगमन होत आहे.
ते झाड म्हणजे पिल्लांचा घरात शिरण्याचा जिनाच होता. आमच्या माऊच्या, बेंजोच्या, सगळ्या पिढ्या त्या झाडावरून चढून आत आयच्या. त्यांची आई बहुधा पहिलं त्याचंच ट्रेनिंग त्यांना देत असावी. तेव्हा मी लहान असल्यानं तिच्या किती पिढ्या आमच्याकडे राहून मोठ्या झाल्या हे मला काही नेमकं सांगता यायचं नाही. अनेक पिल्लं आली नि गेली, राहिली ती फक्त त्यांची आई.