

Pain Management and Relief
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
वेदना पूर्णपणे नष्ट करणं नेहमीच शक्य नसतं, परंतु योग्य औषधोपचार, सकारात्मक दृष्टिकोन, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतले बदल यांच्या साहाय्यानं वेदनांचं योग्य समायोजन करून आपण आपलं आयुष्य अधिक सुसह्य, आनंदी आणि अर्थपूर्ण करू शकतो.
आ ता आम्हाला दुखणं खुपणं समजत हो, पण हे वेदना समायोजन? हे समायोजन म्हणजे काय असतं? ‘सांध्यामध्ये कळा मारती’ किंवा ‘तोल सुटावा अशी वेळ ही, धरा बोट हे नातीचं’ असं हे ‘साठावं वरीस’ धोक्याचं असतं. ‘आताशा वयोमानामुळे गुडघे दुखतात’ हे वृद्धापकाळात येणारे उद्गार आपण ऐकत असतो. कधी खरोखरच तोल जाऊन हाड मोडतं, मग शल्यक्रिया होते, त्यानंतर वेदना होतात; अपघातात जखमा होतात; कधी कॅन्सरसारखा आजार होतो, त्यात वेदना होतात, त्यांचं निराकरण कसं करावं, औषधं काय घ्यावीत, फिजिओथेरपीमुळे लवकर बरं वाटेल का? या सगळ्याचा विचार आणि कृती म्हणजे वेदना समायोजन. याचा विचार कोणत्याही वयासाठी करावा लागतो.
आपल्याला दुखतं का? तर शरीरातल्या एंडॉर्फिन आणि सबस्टन्स पी यांचा समतोल ढळतो म्हणून. समायोजन शब्दाइतकंच हे गूढ वाटतं ना? सोपं करून सांगायचं तर एंडॉर्फिन म्हणजे आपल्या वेदना अडवणारं मेंदूतलं एक रसायन. त्याला ‘फील गुड’ रसायन म्हणतात. सबस्टन्स पी हा शरीरातला अकरा अमिनो ॲसिड्सचा समूह असतो. तो मध्यवर्ती चेतासंस्था आणि आजूबाजूच्या चेतासंस्थेत न्यूरो ट्रान्समिटर किंवा संदेशक म्हणून काम करतो. वेदना, मानसिक ताण आणि सूज नियंत्रित करण्याच्या यंत्रणेला तो जोडला जातो. तो शरीराच्या कोणत्याही भागातून वेदनेचे संदेश मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठवण्याचं काम करतो. ते संदेश पाठीच्या कण्याद्वारे पाठवले जातात. परिणामी आपल्याला दुखतं आणि त्याची ठणठण खुपते. म्हणजे आपल्याला वेदना होते.