

Panhala Fort Plateau Flowers
esakal
डॉ. मंदार दातार
पन्हाळगडचा पठार सारा, घालून पायांखाली
फुले जमविली तऱ्हेतऱ्हेची जीं जीं हाती आली
फुले वेचिलीं पण आता ती द्यावी कोणालागी?
राक्षसीवृत्ति स्मरणदेवता क्षणांत झाली जागी
पन्हाळगडाच्या पठारावर फिरताना कुणाही कवीला पडेल असाच प्रश्न कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींना पडला. इतकी सारी फुले वेचली, पण ती द्यायची कोणाला? जिला द्यायची ती प्रियतमा तर जवळ नाही, मग या फुलांचे करू काय? पण या प्रश्नांआधीचा एक मूलभूत उपप्रश्न हा होता, की या कातळावर इतकी सारी फुले कशी काय फुलली आहेत? हा प्रश्नही गडकरींच्या साहित्याप्रमाणे वर्षानुवर्षे चिरतरुण राहिला. साहित्याला त्याचे उत्तर सापडले नाही. जी कोडी साहित्यिकांना सुटत नाहीत, ती सोडवतात वैज्ञानिक. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे नेहमीच असते असे नाही. गडकरींच्या वाग्वैजयंतीनंतर आठ दशकांनी वनस्पती अभ्यासक डॉ. अपर्णा वाटवे यांनी हाच प्रश्न घेऊन सह्याद्रीच्या पठारांवर, सड्यांवर पाऊल टाकले आणि या कातळ पुष्पसृष्टीचे मर्म उलगडून दाखवले. त्यांनी ही पृष्पसृष्टी वेगळी आहे आणि ती केवळ येथीलच नाही, तर जगभरात विषुववृत्तीय प्रदेशात विस्तारलेल्या रॉक आऊटक्रॉप या परिसंस्थेचा भाग आहे असे पहिल्यांदाच दाखवून दिले आणि यादृष्टीने भारतीय पठारांना जागतिक नकाशावर आणले.