

Parijat Pollination Science
esakal
डॉ. मंदार दातार
पारिजातकाच्या फुलांचा, माहेर त्यागून सकाळीच सासरी जाण्याचा गुणधर्म केवळ दंतकथेपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे उत्क्रांतीची एक स्पष्ट भूमिका आहे. पहाटे जमिनीवर पडलेल्या त्या शुभ्र-केशरी फुलांकडे पाहताना एक वनस्पती अभ्यासक म्हणून माझ्या मनात एक प्रश्न मात्र आवर्जून येतो. हे उदास वृक्षाचे अश्रू आहेत की परागीभवनाची कार्यपूर्ती झाल्यावर शांतपणे बाजूला होणाऱ्या एका कर्तव्यदक्ष फुलाचा अखेरचा प्रणिपात?
रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या ‘पेपर बोट्स’ या कवितेत एक कमाल प्रतिमा रेखाटली आहे. या कवितेत ते म्हणतात, की मी काही कागदाच्या होड्या माझ्या बागेतल्या फुलांनी भरल्या आणि पाण्यावर सोडून दिल्या आहेत. या होड्या रात्री कुठल्यातरी किनाऱ्याला लागतील आणि त्या अनोळखी देशात इथल्या पहाटेचे हे गंध पोहोचतील. या होड्यांत टागोरांनी ठेवली आहेत शिउली किंवा शेफालीची फुलं. आपण ज्याला पारिजातक किंवा प्राजक्त म्हणतो त्या वृक्षाची. शिउली टागोरांच्या काव्यात वारंवार येते. एका महाकवीला या फुलाने इतके झपाटून टाकावे हे पारिजातकाचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.