

Kashmiri Pashmina Shawl Heritage
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
विणकामाच्या प्रक्रियेमध्ये हातमाग हा त्या त्या कारागिराचा जणू कॅनव्हास असतो. शाल असो किंवा स्कार्फ, प्रत्येक उत्पादनात त्या त्या कलाकाराच्या सर्जनशील कौशल्याची खूण गुंफली गेलेली असते. पारंपरिक विणकामातल्या ठसठशीत प्रतिमा आणि सुंदर नक्षीकाम या कलाकारांची तज्ज्ञता आणि देखणी कलादृष्टी अधोरेखित करतात.
भारतीय उपखंडाचं उत्तर टोक असलेलं काश्मीर! नितांत सुंदर निसर्गसौंदर्यामुळे जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणारं हे ठिकाण आहे. या रमणीय सृष्टीसौंदर्याइतकाच इथला सांस्कृतिक वारसाही ठळक आहे. हा वारसा प्रामुख्यानं गुंफला गेला आहे तो काश्मीरमधल्या विविध हस्तकलांमध्ये. यातही शाही वस्त्र म्हणून ओळखली जाणारी काश्मीरची ‘पश्मीना शाल’ ही जगातली सर्वोत्कृष्ट हस्तकला म्हणून नावाजलेली आहे.