

Cake making
esakal
वेगवेगळ्या देशांतील केक्स तयार करताना मला त्या देशाची खाद्यसंस्कृती समजून घेणं महत्त्वाचं वाटतं. आज लोक केक निवडताना केवळ चव नाही, तर अनुभव शोधतात. अनुभवी बेकरकडून लोक हवा तसा केक तयार करून घेतात. केक तयार करणं म्हणजे फक्त बेकिंग नाही, तर भावना, कला आणि विज्ञान यांचा संगम असतो.
केक म्हणजे फक्त वाढदिवसाचा किंवा सेलिब्रेशनचा गोड पदार्थ नाही, तर तो भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, असं मला नेहमी वाटतं. पेस्ट्री शेफ आणि बेकर म्हणून काम करताना मी केककडे केवळ पदार्थ म्हणून नाही, तर एक कथा म्हणून पाहते. प्रत्येक केकचा स्वतःचा असा स्वभाव असतो, स्वतःची पार्श्वभूमी असते आणि त्यामागे वेगळी संस्कृती, इतिहास आणि तंत्र असतं. त्यामुळेच माझ्या किचनमध्ये केक करताना मी फक्त साहित्य मिसळत नाही, तर त्या केकचा मूळ आत्मा जपण्याचा प्रयत्न करते...
मी वेगवेगळ्या प्रकारच्या केक्सवर काम करते - फ्रुटकेक, चीजकेक, शिफॉन केक, ऑपेरा केक, तिरामिसु, क्लासिक स्पॉन्ज केक ते आधुनिक फ्युजन फ्लेव्हर्सपर्यंत. प्रत्येक प्रकारचा केक वेगळ्या तंत्रावर आधारित असतो. बेकिंग सायन्सचं शिक्षण घेतल्यामुळे कोणत्या केकसाठी कोणतं टेक्निक वापरायचं, कोणत्या फ्लेव्हरबरोबर कोणतं टेक्स्चर योग्य बसेल आणि केक हलका, संतुलित आणि चवीला उत्कृष्ट कसा ठेवायचा, या गोष्टींचा अभ्यास आपोआपच झाला.