

What is Patchwork in Fashion
esakal
सोनिया उपासनी
विविध रंगांच्या, आकारांच्या, पोतांच्या आणि प्रकारांच्या कापडांचे छोटे तुकडे शिवून किंवा जोडून नवीन डिझाईन तयार करण्याची कला म्हणजे ‘पॅचवर्क’. पॅचवर्कमध्ये सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा सुंदर संगम दिसून येतो. पूर्वी गरज म्हणून वापरले गेलेले हे तंत्र आज फॅशन उद्योगात लक्झरी डिझाईन म्हणून ओळखले जाते.
बदलत्या काळानुसार फॅशनमध्ये अनेक नवीन तंत्रांचा समावेश होत गेला. त्यापैकी पॅचवर्क ही अत्यंत आकर्षक आणि कलात्मक पद्धत आहे. पूर्वी फाटलेले कपडे दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या तंत्राला आज हायफाय फॅशन उद्योगात विशेष स्थान मिळाले आहे. डिझायनर जॅकेट्स, जीन्स, साड्या, कुर्ते, बॅग्ज, शूज, गृहसजावटीच्या वस्तू आणि आधुनिक फॅशन कलेक्शनमध्ये पॅचवर्कचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आजच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीमध्ये पॅचवर्कला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, पॅचवर्कमुळे कापडाचा पुनर्वापर होतो, कचरा कमी होतो आणि टिकाऊ फॅशनला चालना मिळते.