मुलाखत। प्रशांत अनासपुरे‘किंग ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री’ असे उद्गार ज्यांच्याबाबतीत आदरानं काढले जातात, ते नाव म्हणजे अभिनय सम्राट अशोक सराफ... अशोक सराफ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानिमित्तानं त्यांच्याशी मारलेल्या गप्पा... .पद्मश्रीसारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदा घरच्या कुणाची आठवण येते? अशोक सराफ : पद्मश्री पुरस्कार असो, किंवा मध्यंतरी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असो, असे मानाचे आणि प्रतिष्ठित पुरस्कार घ्यायला उभा असतो, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण येते ती माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांची. माझ्या कलाकृतींना, अभिनयाला मनापासून दाद देणाऱ्या प्रेक्षकांची. कारण त्यांनी मला अशी भरभरून दाद दिली नसती, मला शाबासकी दिली नसती, माझ्यावर विश्वास दाखवला नसता, तर मला हे पुरस्कार मिळालेच नसते. कलाकारासाठी रसिक हे मायबाप असतात असं म्हटलं जातं ते केवळ बोलण्यापुरतं नसतं, तर ते रसिक प्रत्येक कलाकारासाठी खरंच मायबाप असतात. ते तुमच्या चांगल्या कामाचं नक्की कौतुक करतात. मी याबाबत स्वतःला खूप नशीबवान समजतो. एवढी वर्षं मला या मायबाप रसिकांनी एवढं प्रेम दिलं. त्यामुळे या पुरस्कारांमध्ये रसिकांचा मोठा वाटा आहे हे मी मनापासून सांगतो. या पुरस्कारासाठी माझं संपूर्ण नाव पुकारलं गेलं... अशोक लक्ष्मण सराफ... संपूर्ण नाव कानावर पडलं तेव्हा वडिलांची प्रकर्षानं आठवण आली. एरवी असं संपूर्ण नाव घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या आठवणींनी ऊर भरून आला! .अभिनेता अशोक सराफ आणि आता पद्मश्री अशोक सराफ! काय बदल जाणवतो? पद्मश्री पुरस्कार मिळाला याचा आनंद तर नक्कीच आहे, मात्र आता पद्मश्री अशोक सराफ झालो म्हणजे आपण कोणीतरी वेगळे झालो असं मला अजिबात वाटत नाही. पुरस्कार ही आपल्या कामाची पावती असते. पुरस्कार कामाला नवा हुरूप देतात, उत्साह वाढवतात एवढंच मी मानतो. असे पुरस्कार रसिकांनी आपल्यावर केलेल्या प्रेमामुळं मिळतात अशी माझी धारणा आहे. .तुम्ही एखादी भूमिका कशी निवडता? माझ्याकडे एखादी स्क्रीप्ट आली, की ती भूमिका किती लांबीची आहे, मला किती स्कोप आहे, माझं त्यात किती काम आहे याचा मी कमी विचार करतो. मात्र आलेली भूमिका मला आवडली, तर ती भूमिका अधिक चांगल्या पद्धतीनं, रंजकतेनं कशी करता येईल याचा मी जास्त विचार करतो. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर नवनव्या कलाकारांसोबत अशोक मा.मा. ही मालिका करत आहात. अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत भूमिका साकारत असताना या वयातही डेली सोप का करावासा वाटला? चित्रपट भरपूर केले, मध्यंतरी नाटकही सुरू होतंच. मालिका करून बरेच दिवस झाले होते. हम पाँचसारखी मालिका केली होती, मात्र ती डेली सोप नव्हती. सध्या डेली सोपचा जमाना आहे. म्हटलं पाहू हाही एक नवा अनुभव घेऊन! रोज सकाळी लवकर उठून सेटवर पोहोचा आणि आठवडाभर काम करा हा अनुभव दमवण्यासारखा नक्कीच आहे. पण मी माझ्या कामावर सर्वाधिक प्रेम करतो. आवडीचं काम करताना मला जास्तीत जास्त आनंद होतो आणि मी त्यात रमून जातो. त्यामुळे कामाचा थकवा वगैरे जाणवत नाही. नवनवीन कलाकारांसोबत काम करताना आणखी मजा येते, नव्या गोष्टी शिकायला मिळतात. .नव्या कलाकारांना तुमच्यासोबत काम करताना टेन्शन नाही का येत? मी माझ्यासोबत काम करणाऱ्या कुठल्याही नव्या कलाकाराला तसं जाणवूच देत नाही. कोणतीही कलाकृती यशस्वी करायची असेल, तर सर्वांनी मिळून मिसळून काम केलं पाहिजे, तरच ते अधिक चांगलं होतं यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच कलाकार नवीन असोत किंवा अनुभवी असोत, त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी मी पुढाकार घेतो. त्यामुळे नवा-जुना कलाकार अशा गोष्टी आपोआप गायब होतात आणि काम छान होतं! .शूटिंगच्या रोजच्या धावपळीत कोणता डाएट प्लॅन तुम्हाला फायदेशीर ठरतो? शूटिंगची धावपळ सांभाळायची म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळाही सांभाळायलाच हव्यात. मी याबाबत खूप भाग्यवान आहे. आमच्या घरातच याचं उत्तम भान असणारी ‘किचन क्वीन’ आहे, तिचं नाव निवेदिता सराफ! निवेदितामुळे मला काय खायचं आणि काय नाही खायचं हे पक्कं माहीत झालंय. ती फिटनेसबाबत अत्यंत जागरूक असल्यामुळे घरात उत्तम ते सर्व खायला मिळतं. रोजच्या जेवणात वेगवेगळी प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स कशी असतील याची ती कमालीची काळजी घेते. मुळात आम्हा दोघांनाही हॉटेलमध्ये जाऊन खाणं फारसं आवडत नाही. घरीही आम्ही कधी फारसं हॉटेलचं जेवण मागवत नाही. त्यामुळे रोजच्या जेवणातच कडधान्यं, पालेभाज्या, ताजी फळं कायम असतातच. हे करताना तिची खूप कसरत होते, पण सकाळी साडेसात वाजताही आमचा स्वयंपाक तयार असतो, तो केवळ निवेदिताच्या स्वयंपाकाच्या आवडीमुळेच! मुळात ती इतक्या आवडीनं इतकं सगळं काय काय करत असते, की जेवणातला प्रत्येक पदार्थ चविष्टच लागतो. दिवाळीत चकल्या, चिवडा करणं, वेगवेगळ्या पालेभाज्यांची सूप्स करणं हे ती नेहमी करत असते. संध्याकाळी आठ-साडेआठच्या आत जेवण्याचा नियम मी काटेकोरपणे पाळतो ते तिच्याचमुळे. आपण घरी जे काही जेवतो ते कुरकूर न करता, आनंदानं, चवीनं खाल्लं की शरीराला सहज पचतं असं माझं मत आहे. फिल्म इंडस्ट्रीत असलो, तरी उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांना मी फारसा जात नाही. मला पार्टी कल्चर फारसं आवडतही नाही. बाकी गप्पांच्या मैफलीत मी जास्त रमतो. .घरी तुमचा वेळ कसा घालवता?घरी असलो की गाणी ऐकणं, टीव्ही पाहणं आणि वाचन करणं हे माझे आवडते छंद. मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो. प्रत्येक वेळी महाराजांचं एक नवं रूप आपल्याला प्रेरणा देतं असं वाटतं. त्याबरोबरच पु.ल. देशपांडे यांच्या कॅसेट ऐकणं, त्यांची पुस्तकं वाचणं आणि क्रिकेटच्या मॅचेस पाहणं हे माझं वेड आहे. अगदी गल्ली क्रिकेटची मॅचही तितक्याच आवडीनं पाहतो, त्यातही वेगळीच गंमत असते. टीव्हीवरच्या बातम्या पाहणं आणि त्याचबरोबर रोजचं वर्तमानपत्र वाचणं मला फार आवडतं. चहा आणि वर्तमानपत्र हा नित्यनेम असल्यासारखा झालाय. त्याशिवाय करमत नाही. शूटिंगची गडबड नसेल तेव्हा मित्रांबरोबर गप्पा मारायलाही आवडतं. राम अय्यर, किरण शांताराम, विनय येडेकर, सचिन, माझा भाऊ अशा मित्रमंडळींसोबत भरपूर गप्पा होतात. जुन्या आठवणी निघतात, त्यामुळे अनेक किस्से पुन्हा नव्यानं आठवतात. आणि तसंही, घरात माझा एक दोस्त आहेच, आमचा फॅमिली मेंबर सनी, माझ्या डॉगीसोबत मी कितीही तास खेळू शकतो! .महाराष्ट्रातली तुमची आवडती ठिकाणं कोणती?आवडती ठिकाणं भरपूर आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा ही विशेष आवडीची. माझा जन्मच मुंबईतला. माझ्या कामाची सुरुवातही मुंबईतून झाली. मुंबईनं मला खूप काही दिलंय. या शहराशी एक वेगळंच आपुलकीचं नातं निर्माण झालंय. मुंबईचा वेग मला फार आवडतो. इथली कामाची शिस्त प्रत्येक कलाकारानं अंगीकृत करण्यासारखी आहे. मुंबई तुमच्या कष्टांना पुरेपुर साथ देते यावर माझा ठाम विश्वास आहे. मुंबईव्यतिरिक्त कोल्हापूर हे माझं अत्यंत आवडीचं ठिकाण. माझ्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ८० टक्के सिनेमांचं शूटिंग कोल्हापूरला झालं. कोल्हापूरकरांशी माझा एक वेगळाच ऋणानुबंध जुळलेला आहे. कोल्हापूरची माणसं तुमच्यावर मनापासून दिलखुलास प्रेम करतात याचा मी अनेकदा अनुभव घेतला आहे. अगदी घरच्यासारखा जेवणाचा आग्रह, मनमोकळेपणानं बोलणं ही कोल्हापूरकरांची खासियत मला फार भावते. गोवा हे माझ्या आयुष्यातलं आणखीन एक महत्त्वाचं ठिकाण. गोवा माझं आजोळ आहे, त्यामुळे त्या आठवणींनी गोव्याशी एक जिव्हाळ्याचं नातं आहे. .पुण्याबद्दल काय सांगाल?पुण्यात नाटकांच्या प्रयोगांना फार गंमत येते. पुण्याचा नाट्यप्रेमी प्रेक्षक कलाकारांना मनापासून दाद देतो. पुणेकर स्पष्ट बोलणारे असल्यामुळे कलाकारांना उगाचच दाद दिली असं होत नाही. नाटक असो वा सिनेमा, ती कलाकृती आवडली तर टाळ्या वाजवणारे पुणेकर आणि नाही आवडली तरी वेगळ्या पद्धतीनं टाळ्या वाजवणारे पुणेकर कलाकारांना कळतात. सुदैवानं मी याबाबत भाग्यवान ठरलो. माझ्या नाटकांना, चित्रपटांना पुणेकरांनी नेहमीच मनमुराद दाद दिलीये!.सिनेसृष्टीतील नवोदितांना काय संदेश द्याल?सध्या सिनेसृष्टीची गणितं खूप बदलली आहेत. टेन्शन्स, धावपळी वाढल्या आहेत. स्पर्धा वाढली आहे. यात टिकायचं कसं, असं अनेकांना वाटू लागतं. मात्र टिकणं फारसं अवघड नाही असं मला वाटतं. तुमच्या हाती असलेलं काम आनंदानं करणं आणि पुरेपूर प्रयत्न करून तुमच्यातलं सर्वोत्कृष्ट देणं तुमच्या हातात नक्की असतं. मला वाटतं आपण ते करत राहिलं पाहिजे. कामाचा आनंद घेत काम करत राहायचं. रोजच यशाचं मोजमाप करत बसण्यापेक्षा आपल्या कामात गढून जाणं जास्त आनंददायी असतं असं मला वाटतं. तुम्हीही ते करून तर पाहा.(प्रशांत अनासपुरे सिनेनाट्यसृष्टीशी संबंधित पुणेस्थित मुक्त पत्रकार आहेत.)----------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.