मनोज बिडकर
ऑक्टोबरच्या असह्य उकाड्यात वेगळ्या फोटोच्या शोधात होतो... आणि त्याच दिवशी कॅमेऱ्यात बंदिस्त झाला भीषण प्रसंग. पेशवे पार्कमधील पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात एका तरुणाने उडी मारली. क्षणार्धात त्या वाघाने त्याच्यावर झडप घातली. काही समजायच्या आतच सगळं काही घडत होतं. त्या अविस्मरणीय प्रसंगाच्या तीन फ्रेम्स मिळाल्या. त्याचे हे स्मरणरंजन...
पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. २००० साल. ऑक्टोबर महिना. पण हवामान मात्र एप्रिल-मेच्या उन्हाच्या चटक्यालाही मागं टाकणारं. उकाडा इतका असह्य झाला होता की सकाळी नऊ वाजताच अंगाला उन्हाचे अक्षरशः चटके जाणवत होते. घामाच्या धारा ओघळत होत्या. ‘ऑक्टोबर हीट’ म्हणजे काय असतं, हे त्या दिवशी अक्षरशः शरीरावर कोरलं गेलं.
असा उन्हाचा चटका वाढत असतानाच सकाळी नेहमीप्रमाणे ‘आजच्या वेगळ्या फोटोचा विषय’ मनात घोळू लागला होता. माझ्या मते, एक उत्तम वृत्तपत्र छायाचित्रकार नेहमी अशा क्षणाच्या शोधात असतो, जो क्षण हजार शब्दांच्या बातमीतही सापडत नाही. तो त्यासाठीच धडपडत असतो.