

war love story
esakal
योगिनी वेंगुर्लेकर
खारकिव्हवरच्या रशियन आक्रमणाबद्दलच्या बातम्या जसजशा येऊ लागल्या तसतशी ऐरिना कमालीची बेचैन दिसू लागली होती. एक दिवस तर ऑफिस सुरू होऊन जेमतेम दोन तासदेखील झाले नसतील, तितक्यातच तिनं त्याला जागचं उठवून कॉफी प्यायला नेलं होतं नि डोळ्यात टिपूससुद्धा येऊ न देता ती फक्त बोलत राहिली होती...
गर्दीला स्वतःचा असा एक आवाज होता, त्या तुफान गर्दीच्या रस्त्यानं पुरू चालला होता. गर्दीचा तो आवाज भलेही कर्कश्श असेल, पण त्या आवाजाला स्वतःचं एक खास अस्तित्व होतं. कारण तो आवाज हजारोंच्या संख्येनं घराकडे निघालेल्या माणसांच्या बोलण्याचा, हसण्याचा, क्वचित भांडण्याचा होता आणि या आवाजाला धार चढत होती ती धावणाऱ्या बसेस, टॅक्सीज, बाइक्स चालवणाऱ्यांनी वाजवलेल्या कर्कश्श हॉर्न्समुळे!
गर्दीतून चालणारी ती माणसं ठरावीक काळ अधोरेखित करत चालली होती. प्रौढ, म्हातारे, तारुण्याच्या चढणीच्या रस्त्याला लागलेले स्त्री-पुरुष, सगळेच्या सगळे साड्या, सलवार-कुडता, लाँग स्कर्ट््स, शॉर्ट्स, बेल बॉटम पँट्स वगैरे वस्त्रं परिधान करून चालले होते. तशाच त्यांच्या केसांच्या तऱ्हादेखील स्पेशलच होत्या. बॉबकट, पोनीटेल, बुलगॅनिन टाइप दाढी, डोक्यावर मागे छोटी शेंडी वगैरे वगैरे... तर त्या जमावातल्या अनेकांच्या मनात काही स्मृती घट्ट होत्या आणि म्हणून इथं पिढ्यानपिढ्या राहत असूनसुद्धा कुणी हिंदी, कुणी मराठी, कुणी मल्ल्याळी, कुणी गुजराती, तर कुणी तमिळमध्ये बोलत होते. या गलबल्यातल्या फारच थोड्यांना याची जाण होती, की हा जो काळ चाललाय, तोच एखाद्या संस्कृती रक्षकाच्या, नवा इतिहास घडवून पाहणाऱ्या अहंकारी नेत्यांच्या स्मृतीत अडकून बसला, तर भयकारी कृतीला कारण ठरण्याची शक्यता आहे.
गर्दीचा एक भाग होऊन चाललेल्या पुरूच्या मनात हा विचार आला नि तो एकदम अस्वस्थ झाला. त्या विचारासोबत सध्याच्या जागतिक घडामोडींचा मनातल्या मनात धांडोळा घेत पुरू चालत चालत टिळक ब्रिजवर आला. ती अफाट गर्दी, मोठ्या आवाजात बोलणारे लोक, सतत घामाची चिकचिक! क्षणभर त्याला इंडियाला परतल्याचा रागच आला. पण मग इंडिया हेच तर आता हॅपनिंग सेंटर आहे, असं काहीसं पुटपुटत तो पुन्हा वेगानं चालायला लागणार, तोच त्याच्या हातातला मोबाईल व्हायब्रेट झाल्याचं जाणवलं. म्हणून मग त्यानं कडेला थांबून मोबाईल उचलला तर ऐरिनाचा मेसेज!