सतीश पाकणीकर
इतर कलांच्या विकसनकाळाच्या मानाने अत्यंत अल्प असलेला १८६ वर्षांचा काळ प्रकाशचित्रकलेमध्ये विविधांगी बदल घडवत गेला. त्यामुळे सध्या आपण पाहत असलेले कलेचे हे सरळ सोपे आणि विकसित रूप सज्ज झाले. आज रोजच्या रोज आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दृक-श्राव्य कलांना सामोरे जात असतो. जरा बारकाईनं निरीक्षण केल्यास आजच्या दृककलांमध्ये प्रकाशचित्रकलेचा वापर किती अपरिहार्य आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.
वेगवेगळ्या उपयोजित कलांचा विचार करतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते, की यातील प्रत्येक कलेला आपापला शेकडो वर्षांचा वारसा आहे. त्या वारशामुळे आलेली समृद्धी आहे. या दृक-श्राव्य कलांचे कुठेतरी एक समान सूत्र आहे. कोणत्याही कलेची निर्मिती, विकास, आस्वादन हे इतर कलांपेक्षा फारसे वेगळे नसते. वेगवेगळ्या काळात या कला विकसित होत गेल्या. या कला बहरत असतानाच एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात आणखी एका कलेचा उगम होत होता, ती म्हणजे ‘प्रकाशचित्रकला’!