संदेश भंडारे
देवळी कोनाडे, कुस्तीचा आखाडा, बहुरूपी व समूह आणि इतर अनेक विविध विषयांबरोबरच मी महाराष्ट्रातील ढोलकी फडाचा तमाशा आणि पंढरीची वारी या लोकपरंपरांचेही छायाचित्रण अनेक वर्षे करत आहे. या लोकपरंपरांचा गाभा पकडण्याचा प्रयत्न मी केला. तमाशा आणि वारीमधील सामान्य माणसांच्या छायाचित्रणाला महत्त्व दिले.
ऐतिहासिक ठिकाणे, अपरिचित माणसे, निसर्ग, समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भावना आणि नातेसंबंध हे सर्व छायाचित्रांचे विषय म्हणून महत्त्वाचे आहेतच, पण मग त्या प्रत्येक विषयाची छायाचित्रे, उत्तम फोटो डॉक्युमेंट्स अर्थात छायाचित्र दस्तावेज मानली जातात का? मी म्हणेन, जी छायाचित्रे आपल्याला आपल्या जगाबद्दल काहीतरी महत्त्वाचे सांगत असतात आणि त्याचबरोबर जगाबद्दल आपल्याला एका नवीन पद्धतीने विचार करायला भाग पडतात, ती छायाचित्रे उत्तम छायाचित्र दस्तावेज मानली जातात.
छायाचित्रणाच्या पावणे दोनशे वर्षांच्या इतिहासाकडे नजर टाकली असता, छायाचित्रणाचे अनेक टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा व्यापक होता आणि तो थेट फोटोग्राफीच्या शोधाशी संबंधित होता. त्यानंतरच्या छायाचित्रकारांनी नायगारा धबधबा, इजिप्शियन पिरॅमिड अशा दूरवरच्या, अनोळखी ठिकाणांची दृश्ये टिपण्याचे काम केले.
या निसर्गरम्य दृश्यांना व्यापक लोकप्रियता मिळाली. त्यावेळी कॅमेरा प्रामुख्याने निसर्गाची हुबेहूब नक्कल तयार करू शकणारे माध्यम म्हणून वापरला जात होता. त्याचा परिणाम असा झाला, की ती छायाचित्रांना ‘पुराव्यां’चा दर्जा मिळाला. कॅमेऱ्याच्या या वैशिष्ट्यामुळे असा एक ठाम विश्वास निर्माण झाला, की कॅमेरा खोटे बोलत नाही. कॅमेऱ्यावरील हा विश्वास डॉक्युमेंटरी फोटोग्राफीला आधार देऊन गेला.
तमाशा आणि वारी या लोकपरंपरांनी मराठी माणसाचे उदारमतवादी मानस घडविण्यात मोठ सहभाग नोंदविला आहे असे मानून आत्मभान ट्रस्टच्या माध्यमातून या दोन लोकपरंपरांवर प्रकाश टाकतील अशा दस्तावेज (डॉक्युमेंट) समजल्या जाणाऱ्या छायाचित्रांचे व त्या लोकपरंपरांमागील मर्म लोकांसमोर आणण्याकरिता संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांचे एक कायम स्वरूपी कलादालन उभे करण्यात येत आहे. हे संग्रहालय पुणे ते पंढरपूर वारी मार्गावर चिंचणी या गावी २०२६पर्यंत लोकसहभागातून उभे करण्यात येणार आहे. त्याकरिता चिंचणी ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी एक जागाही उपलब्ध करून दिली आहे.