
डॉ. सदानंद मोरे
किसिंजरच्या किंवा खरेतर कोणत्याही महत्त्वाच्या मुत्सद्याच्या किंवा नेत्याच्या कृतीकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहता येणे व त्यानुसार त्याच्या कृतीचा अन्वयार्थ आणि संगती लावता येणे शक्य आहे. तो स्वतः ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो त्याचे हितसंबंध जोपासणे हे त्याचे आद्य कर्तव्य समजून जसे हे करता येईल, तसेच तो कोणत्या विचारप्रणालीचा किंवा आदर्शव्यूहाचा (Ideology) पाठीराखा आहे हे लक्षात घेऊनही हे करता येईल. काहींच्या बाबतीत त्यांचा धर्म मध्यवर्ती ठेवून त्याच्या अनुषंगाने तो काय करतो हे समजून घेता येईल.