विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
रुझवेल्टने किपलिंगची कविता हेन्री लॉज याच्याकडे पाठवली. त्याला ती आवडली आणि अमेरिकेच्या साम्राज्याचा असा विस्तार करायला हरकत नाही, असे ठरले. किपलिंगने असे कृत्य हा गौरवर्णीय माणसांनी स्वतः होऊन आपल्या शिरावर घेतलेला भार असून, ती दैवी योजना असल्याचे प्रतिपादन केले होते. सबब हे कृत्य साम्राज्य तृष्णेतून केलेले साम्राज्यवादी कृत्य ठरणार नसून केवळ कर्तव्यपूर्तीचा भाग ठरेल.
सत्ताधीशांनी इतरांवर सत्ता का गाजवायची याचा एक अर्थ म्हणजे ती सत्ताधीशांची इच्छा आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे ज्यांच्यावर ते सत्ता गाजवीत आहेत त्यांना ती स्वीकार्य वाटते, मान्य आहे. वस्तुतः सत्ता गाजवणारा वर्ग माणसांचाच असतो व ज्यांच्यावर त्याची सत्ता चालते तीही माणसेच असतात. मग माणसांमधील एका गटाने माणसांमधीलच दुसऱ्या गटावर सत्ता का गाजवावी, याचे स्पष्टीकरण आणि समर्थन करण्याची गरज भासणार हे उघड आहे. काही वेळा स्पष्टीकरण हेच समर्थन होत असते, तरी त्यांच्यातील भेद लक्षात घ्यायला हवा.