सलील उरुणकर
सायंकाळच्या अरबट-चरबट खाण्यामुळे होणारे आरोग्याचे धोके ओळखून प्रीती देशमुख यांनी पौष्टिक स्नॅक्सची संकल्पना विकसित केली. आहारशास्त्राच्या ज्ञानातून त्यांनी आरोग्यदायी पर्याय तयार केले आणि इतर महिलांनाही या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमातून आरोग्य, उद्यमशीलता आणि महिला सबलीकरण यांचा मिलाफ साधला.
दैनंदिन धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही आजची मोठी समस्या आहे. या विषयावर अनेक रील्स, पॉडकास्ट किंवा ब्लॉग आपण पाहतो आणि ऐकतो. पण त्यात दिलेले उपाय वास्तवात फारसे उपयोगी पडत नाहीत. यामागचं प्रमुख कारण म्हणजे पौष्टिक आहाराच्या वेळा पाळता न येणं.
सकाळी नाश्ता करून ऑफिसला किंवा कामावर निघाल्यानंतर घरून आणलेला डबा दुपारी संपतो. पण सायंकाळी पाच वाजता लागणारी भूक आपोआपच आपल्याला कॅन्टिन, हॉटेल किंवा हातगाडीवरच्या समोसा-वडापावकडे घेऊन जाते. हीच समस्या ओळखून पोषणतज्ज्ञ प्रीती देशमुख यांनी एक अभिनव उपाय शोधला. न्यूट्रिशन कन्सल्टिंगच्या अनुभवातून त्यांना ही कल्पना सुचली. सायंकाळच्या भूकेसाठी पौष्टिक आणि चविष्ट पर्याय देणाऱ्या खाद्यपदार्थांची साखळी उभी करायची. या कल्पनेतून ‘फूडनेस्ट’ या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आज प्रीती देशमुख केवळ आहारतज्ज्ञ नाहीत, तर फूडनेस्टच्या माध्यमातून स्वतःची ओळख एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी निर्माण केली आहे. या प्रवासात अडथळे आलेच, पण ठामपणे प्रत्येक आव्हानाचा सामना करत त्यांनी हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवला. आरोग्य, आहार आणि उद्योजकता यांची त्यांनी घातलेली सांगड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.