Premium|Sahitya Sammelan: साहित्यविश्वात होणाऱ्या बदलांविषयी प्रा. मिलिंद जोशी यांची विशेष मुलाखत

Marathi literature: साहित्य संमेलनांचं सध्याचं स्वरूप, त्यात आवश्यक असणारे बदल, महामंडळाची पुढील तीन वर्षांतील दिशा कशी असेल..?
prof milind thombare interview
prof milind thombare interviewEsakal
Updated on

मुलाखत । महिमा ठोंबरे

साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आता पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले असून, प्रा. मिलिंद जोशी यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात आता ऐतिहासिक अशी ९९वे, १००वे आणि १०१वे अशी तीन साहित्य संमेलनं होणार आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनांचं सध्याचं स्वरूप, त्यात आवश्यक असणारे बदल, महामंडळाची पुढील तीन वर्षांतील दिशा इत्यादी विषयांवर

प्रा. जोशी यांच्याशी साधलेला संवाद...

Q

साहित्य संमेलनांच्या स्वरूपात बदल होत गेलाय असं वाटतं का?

A

प्रा. मिलिंद जोशी ः मी पहिल्यांदा साहित्य संमेलनाला गेलो, त्यावेळी संमेलनाचं स्वरूप अतिशय साधं होतं; पण त्यात आशयघनता खूप होती. अनेक दिग्गज लेखक जवळून पाहता यायचे. १९८०मध्ये बार्शीसारख्या छोट्या गावात संमेलन झालं होतं, तिथं फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. संमेलनासाठी आलेले लेखक लोकांच्या घरी उतरले होते. स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत, खाली पाटावर बसून जेवण असं सगळं त्यावेळचं चित्र.

पण कोणालाही त्याचं काही वावगं वाटतं नव्हतं आणि त्याचा ताणही येत नव्हता. विशेष म्हणजे, त्यावेळी सगळे प्रतिष्ठित लेखक संमेलनात दिसायचे. मराठी साहित्याचं प्रातिनिधिक रूप तिथं पाहायला मिळायचं. नंतरच्या काळात संमेलनं थोडी अधिक देखणी; किंबहुना दिखाऊ करण्याच्या नादात त्यातला आशय हरवत गेला.

यासाठी केवळ संयोजकांवर दोषारोप करून किंवा महामंडळावर याचा दोष टाकून चालणार नाही. गेल्या २०-२५ वर्षांत समाजाचादेखील दृष्टिकोन बदलला आहे. करमणुकीची असंख्य माध्यमं उपलब्ध झाली आहेत, जगण्याचं वेळापत्रक अधिकाधिक क्लिष्ट होत आहे, जगण्याचा संघर्ष या काळात तीव्र झाला आहे. या परिस्थितीमुळे लोकांचे प्राधान्यक्रम बदलले. त्यामुळे साहित्याला यात थोडा खालचा क्रमांक मिळाल्याचं दिसतं आहे.

Q

बऱ्याचदा साहित्य संमेलनाची तुलना ‘लिट फेस्ट’शी केली जाते...

A

प्रा. मिलिंद जोशी ः ‘जयपूर लिट फेस्ट’सारख्या महोत्सवांची साहित्य संमेलनांशी तुलना करणं अप्रस्तुत आहे. कारण अजूनही सगळी लिट फेस्ट्स सधन वर्गासाठीच आहेत. तिथल्या पंचतारांकित सुविधा सर्वसामान्यांना परवडू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य माणूस अजूनही साहित्य संमेलनात येऊ शकतो, त्याला संमेलन आपलंसं वाटतं.

परदेशात असलेल्या एक आजी भारतात आल्या. त्यांनी तिरुपती, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर अशा सगळ्या ठिकाणच्या देवस्थानांना भेटी दिल्या. परत आल्यावर म्हणाल्या, की पंढरीचा पांडुरंग मला सर्वाधिक ‘ॲक्सेसिबल’ वाटतो. कोणताही निर्धन, निष्कांचन वारकरी त्याच्या पायाशी जाऊ शकतो. साहित्य संमेलनाचंही तसंच आहे. तेच संमेलनाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे.

मी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ‘संमेलनाचा साचा बदलला पाहिजे,’ असं विधान केलं होतं. मात्र आहे तो साचा जरी नीट वापरला, तरी अनेक गोष्टी दुरुस्त होऊ शकतात. कारण काही एक विचार करून हा संमेलनाचा साचा तयार करण्यात आला होता. पूर्वी शाखा संमेलनं होत असत, त्यात एखाद्या विशिष्ट वाङ्‍मय प्रकारावर गंभीर चर्चा होत असे. त्यायोगे साहित्यातील अभ्यासू गटाला तिथं वाव मिळायचा. मी पाहिलेल्या सर्व संमेलनांमध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि मुख्य मंडप, यात केवळ दहा पावलांचं अंतर असायचं. त्यामुळे प्रकाशकांची कधीही तक्रार येत नसे.

Q

ग्रंथ प्रदर्शनला किती प्राधान्य द्यायला हवं?

A

प्रा. मिलिंद जोशी ः साहित्य संमेलनाच्या नियोजनात ग्रंथ प्रदर्शनाला प्राधान्य द्यायलाच हवं. कारण पुस्तक हाच साहित्य व्यवहाराचा खरा आत्मा आहे. लेखकाला, प्रकाशकाला ओळख मिळवून देण्याचं काम पुस्तकंच करतात. मराठी साहित्याचा डोलारा पुस्तकांवरच उभा आहे. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शनाला दुय्यम स्थान देऊन चालणार नाही.

काही विशिष्ट भागातच मराठी पुस्तकांची खरेदी होते, ती वाचली जातात, असा आपल्याकडे भ्रम आहे. पण महाराष्ट्रातील वाचकांनी हे भ्रम दूर केले आहेत. २०१२चं संमेलन चंद्रपूरला घ्यायचं ठरवल्यावर तिथं ग्रंथविक्री होणार नाही, असा हलकल्लोळ प्रकाशकांनी केला होता. पण सर्वाधिक ग्रंथविक्री त्याच संमेलनात झाली. तिथली मागणी इतकी वाढली, की संमेलन संपल्यानंतरही दोन दिवस ग्रंथ प्रदर्शन सुरू होतं.

Q

संमेलनाच्या नियोजनावेळी अनेक अडचणी येतात...

A

प्रा. मिलिंद जोशी ः संमेलनासाठी मार्गदर्शन समिती असते. या समितीनं कार्यक्रम पत्रिका तयार करून संयोजकांच्या हाती दिली, की तिथून पुढे सगळा गोंधळ सुरू होतो. कारण कार्यक्रम पत्रिका ठरवणं ते प्रत्यक्ष संमेलन होणं, याच काळात खूप बदल घडतात. महामंडळाची संमेलनावरची पकड या काळात निसटत जाते. दुसरीकडे संयोजकांनीही संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी केवळ वर्तमानपत्रातील बातम्यांवर विसंबून राहून चालणार नाही. संमेलन होत असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फलक लागले पाहिजेत. आसपासच्या परिसरातील शाळांचे विद्यार्थी संमेलनाला येतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माणसं येत नाहीत, ही तक्रार करण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाही, याचं आत्मपरीक्षण करून त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर, ग्रंथालय-वाङ्‍मय मंडळ यांच्याशी संवाद अशी अनेक पावलं टाकता येतील.

Q

संमेलनं शहरात व्हावीत की गावांमध्ये?

A

प्रा. मिलिंद जोशी ः ग्रामीण भागात अजूनही मोठी साहित्यिक-सांस्कृतिक भूक आहे. मी स्वतः ग्रामीण भागात व्याख्यानांच्या निमित्तानं फिरताना हे अनुभवलं आहे. दुसरीकडे पुण्यासारख्या शहरांमध्ये नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे काही विशेष निमित्तानं पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये संमेलनं नक्कीच व्हावीत. पण एरवी जिल्हा पातळीवर संमेलनं घ्यायला हरकत नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ यांची शाखा संमेलनं गावागावांमध्ये होऊ शकतात.

Q

संमेलनांमध्ये सर्वाधिक चर्चा होते ती अव्यवस्थेची...

A

प्रा. मिलिंद जोशी ः लहान गावांमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे ही अडचण निर्माण होते. पण एकीकडे आपण भाषेचा उत्सव म्हणत असू, तर तो नक्कीच देखणा आणि व्यवस्थित करायला हवा. त्यामुळे शक्य होईल तिथं ही अव्यवस्था टाळण्याचं नियोजन केलं पाहिजे.

साहित्यिकांवर आपण अधिक खर्च केला पाहिजे. सध्या भोजनावळी आणि मंडप यांच्यावर सर्वाधिक खर्च केला जातो. तो टाळता येऊ शकतो. त्याऐवजी आपल्याकडच्या दिग्गज साहित्यिकांवर तो पैसा खर्च व्हायला हवा. जिथं सन्मान करणं आवश्यक आहे, तिथं तो झालाच पाहिजे. एखाद्या ९० वर्षीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकाच्या प्रवासाची व्यवस्था चांगलीच व्हायला हवी. आपल्याकडे संमेलनात सहभागी साहित्यिकच संमेलनाला येतात. मात्र असं न होता सर्वच साहित्यिकांनी संमेलनात येण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू.

Q

साहित्य संमेलनांमध्ये तरुणांचा सहभाग कमी असतो...

A

प्रा. मिलिंद जोशी ः संमेलनांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज आयटी, व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण विविध प्रकारे लिहीत आहेत. ‘लेखक’ ही ओळख त्यांच्यासाठी अभिमानाची आहे. त्यामुळे संमेलनांमध्ये एक मंडप खास तरुणांसाठी राखून ठेवायला हवा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी परिसंवाद, व्याख्यान यांचा ढाचा बदलावा लागेल. परिसंवादाला एक अध्यक्ष हवा, मग वक्त्यांनी दिलेल्या वेळेत बोलायचं, अशा कर्मकांडात अडकण्यापेक्षा खेळकर वातावरणात कार्यक्रम होतील, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यासारखे अनेक बदल आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचं दृश्यरूप येणाऱ्या संमेलनांमध्ये नक्कीच दिसेल.

prof milind thombare interview
Premium| Study Room : नक्षलवादमुक्त भारत साध्य करण्याच्या मार्गावर
Q

संमेलनाव्यतिरिक्तही काही काम करणार का?

A

प्रा. मिलिंद जोशी ः साहित्य महामंडळ केवळ संमेलनापुरतेच मर्यादित राहते, अशी एक टीका केली जाते. खरंतर संमेलनं भरवणं, हेच महामंडळाचं मुख्य काम आहे. त्यासाठीच १९६१मध्ये महामंडळाची स्थापना झाली. मात्र संमेलनाव्यतिरिक्तही काम करण्याचा प्रयत्न आम्ही महामंडळ म्हणून करणार आहोत. दरवर्षी एक वेगळा प्रकल्प हाती घेऊन त्यावर काम करण्याचा मानस आहे. पुढील पन्नास वर्षं उपयुक्त ठरेल, असं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असेल. आपल्याकडे वाचन संस्कृतीचं अधिकृत सर्वेक्षण झालेलं नाही. तंत्रज्ञानाच्या आणि तंत्रज्ञांच्या मदतीने महामंडळातर्फे या संदर्भात सर्वेक्षण करता येईल.

prof milind thombare interview
Premium| Study Room: स्पर्धा परीक्षांसाठी कोणती नीतीमूल्ये हवीत?
Q

साहित्यविश्वात समन्वय आणण्यासाठी काय करता येईल?

A

प्रा. मिलिंद जोशी ः मराठी साहित्याचं विश्व लहान असलं तरी ते गटातटांत विभागलं गेलं आहे. या सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणणं कठीण आहे. राजकारण्यांपेक्षा बुद्धिवंतांमधलं राजकारण अतिशय कुटिल आहे. त्यात मानापमानही होतात. पण संघर्षापेक्षा समन्वय आणि संवादावर माझा अधिक भर आहे. साहित्य संमेलनाचे संयोजक दरवेळी बदलत असतात, महामंडळाचे अध्यक्षही बदलत असतात.

मी समन्वयवादी आणि संवादावर विश्वास असणारा व्यक्ती आहे. त्यामुळे शक्यतो वाद टाळण्याकडे माझा कल असेल. निमंत्रण आलं नाही, म्हणून संमेलनाला न येणाऱ्या साहित्यिकांना मी सन्मानानं निमंत्रण पाठवेन. पण त्यांनीही मानापमान बाजूला ठेवत वडिलधाऱ्यांच्या भूमिकेतून संमेलनाला यावं, अशी माझी इच्छा आहे.

Q

संमेलनावर राजकारण्यांचा दबाव असतो का?

A

प्रा. मिलिंद जोशी ः संयोजकांनी राजकारण्यांचा, नेत्यांचा दबाव घेण्याचं काही कारण नाही. संमेलनाची ही रीत आहे, ही आचारसंहिता आहे, असं राजकारण्यांना स्पष्टपणे सांगता यायला हवं. पण बऱ्याचवेळा ज्या गावात संमेलन होत असतं, त्या गावातील प्रत्येकाची त्यात गुंतवणूक झालेली असते. त्यामुळे संमेलनात आपल्याला स्थान मिळायला हवं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. अशावेळी कोणालातरी वाईटपणा पत्करून त्यातून मार्ग काढावा लागेल. उदाहरणार्थ, जर मुख्यमंत्री उपस्थित असतील, तर केवळ त्यांनी मनोगत व्यक्त करणं पुरेसं आहे. अन्य नेत्यांना भाषणासाठी नाही म्हणता यायला हवं.

साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांचीच चर्चा झाली पाहिजे. राजकारणाची चर्चा व्हायची असेल तर ती साहित्यिकांच्याच राजकारणाची व्हावी, साहित्यिकांच्याच येण्याची अथवा न येण्याची, साहित्यिकांच्याच बोलण्याची चर्चा व्हावी. कारण संमेलनाचे खरे ब्रँड ॲम्बेसेडर साहित्यिकच आहेत. साहित्यिक आणि वाचक हे संमेलनाच्या केंद्रस्थानी येतील, तेव्हा संमेलनाचं स्वरूप नक्कीच पालटलेलं दिसेल. हे आम्ही नक्कीच करायचा प्रयत्न करू.

(महिमा ठोंबरे दै. सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये वार्ताहर आहेत.)

----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com