भवताल वेध। गोपाळ कुलकर्णी
हिटलरच्या छळछावणीतून बचावलेले दोन लाखांपेक्षाही अधिक ज्यू अद्याप जिवंत आहेत, पण त्यातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शंभरी ओलांडली असल्याने ते कधीही ‘एक्झिट’ घेऊ शकतात.
‘‘‘त्या’ भयंकर भूतकाळाला आता शंभरपेक्षा अधिक वर्षे उलटून गेलीयेत, माणुसकी थिजवून टाकणारा ‘तो’ काळ आठवला की आजही काळजाचा थरकाप उडतो. रात्रीचे भास होतात, अचानक मधेच दचकून उठायला होतं, बाहेर रक्त गोठवणारी थंडी असते, पण मला मात्र घाम फुटतो,’’ शंभरी ओलांडलेले अलब्रेक्ट वेईनबर्ग नाझीकालीन कटू स्मृतींना उजाळा देताना प्रचंड भावूक झालेले दिसतात. ‘‘त्या निर्दयी काळानं जसं आप्तस्वकीयांना हिरावून नेलं, तसंच मनाच्या पटलावर वेदनेची अमीट मोहोर उमटविली.
दिवस सरले... वेदना संपली, पण भूतकाळ मात्र पिच्छा सोडायला तयार नाही. तो सारखा डोकावत राहतो. कधी बातम्यांतून तर कधी आठवणींतून.. उद्या जेव्हा आमची पिढी या पृथ्वीतलावर नसेल तेव्हा आम्ही भोगलेल्या नरकयातना त्यांना पुस्तकांतून वाचाव्या लागतील,’’ असं सांगताना त्यांची नजर शून्यात खिळते. ‘ऑशवित्झ छळछावणी’च्या त्या कालकराल गुहेतून ते हळूच वर्तमानामध्ये येतात...