

Public Infrastructure Cost
esakal
डॉ. अमेय खरे
सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रस्ता नीट असणं, बस वेळेवर मिळणं, कचरा उचलला जाणं, पाणी येणं आणि रात्री रस्त्यावर दिवे लागलेले असणं, या सगळ्या गोष्टींकडे आपण वेगळा आर्थिक व्यवहार म्हणून बघत नाही. पण या सुविधा चांगल्या असतील, तर त्या आपला वेळ वाचवतात, अनावश्यक खर्च टाळतात आणि आपल्याला काम, शिक्षण, आरोग्य आणि इतर संधींपर्यंत पोहोचणं सोपं जातं.
पहिला प्रसंग - रात्रीचे आठ वाजले आहेत. एका सोसायटीतून एक महिला आपल्या मुलासोबत जवळच्या दुकानात जाण्यासाठी बाहेर पडते. दुकान घरापासून फारसं दूर नाही, पण रस्त्याच्या एका कोपऱ्यावरचा दिवा बंद आहे, पुढे फुटपाथ तुटलेला आहे आणि रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागाही नाही. अंतर काही मिनिटांचं असलं, तरी त्या छोट्याशा प्रवासासाठी आता अधिक काळजी घ्यावी लागते.
दुसरा प्रसंग - सकाळी त्याच रस्त्यावरून शाळेची मुलं, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार आणि वाहनचालक जातात. कचरा वेळेवर उचललेला असतो, पाणीपुरवठा सुरू असतो आणि आपत्कालीन सेवाही वेळेवर पोहोचते. खरंतर या सगळ्या सोयी व्यवस्थित असतील, तर आपण त्यांचा फारसा विचार करत नाही, पण एखादी सुविधा अचानक बंद पडली की तिचं महत्त्व लगेच जाणवतं.