

Pune Film Festival
esakal
या आठवड्यातच पुणे फिल्म फेस्टिव्हलला (पिफ) पुण्यात सुरुवात झाली. कोणताही चित्रपट महोत्सव पाहणे एक समृद्ध करणारा अनुभव असतो यात शंकाच नाही. शंभरावर देशांचे शेकडो सिनेमे एकाच वेळी प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतात आणि त्यातील आपल्या आवडीनुसार निवडक सिनेमे पाहून आपले ज्ञान, भावविश्व जोखून घेण्याची संधी प्रेक्षकांनी मिळत असते. अलीकडेच झालेल्या ‘इफ्फी’मध्ये अनेक प्रयोग पाहायला मिळाले व ‘पिफ’मध्ये अनेक नवे चित्रपट व प्रयोग पाहायला मिळतील. मात्र, महोत्सव कसा पाहावा हे एक शास्त्र आहे आणि ते अर्थातच आपल्या अनुभवातूनच विकसित होत राहते. यासाठीची तपश्चर्या मोठी असते. महोत्सवाला जाणे व तो पाहणे यात करायच्या आणि टाळायच्या गोष्टींबद्दल...
चित्रपट पाहण्याची इच्छा असणाऱ्या दर्दी प्रेक्षकांसाठी दरवर्षी राज्य, देश व जगभर विविध चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते. यामध्ये त्या वर्षीच्या विशिष्ट कालावधीत प्रदर्शित सिनेमे आमंत्रित केले जातात व ते प्रेक्षकांपुढे सादर केले जातात. यामध्ये लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेक्षक म्हणून तुम्हाला देशात कोठेही प्रदर्शित न होणारे व प्रेक्षागृहात जाऊन पाहणे कठीण असलेले सिनेमे निवडावे लागतात. म्हणजे महोत्सवामध्ये कायमच इंडियन पॅनोरमा नावाचा विभाग असतो व त्यामध्ये हिंदी, मराठी, तेलगूसह भारतात प्रदर्शित झालेले किंवा होऊ घातलेले सिनेमे प्रदर्शित होतात. आता, हे सिनेमे तुम्ही अनेक माध्यमांतून देशात पाहू शकता, मात्र काही महत्त्वाच्या विभागांतील सिनेमे तुम्ही पुन्हा भारतात पाहू शकणार नसल्याने त्यांना प्राधान्य देणे गरजेचे ठरते. महोत्सवामध्ये २०पेक्षा अधिक प्रकारांतील सिनेमे दाखवले जातात. यामध्ये इतर महोत्सवांत गाजलेले सिनेमे, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, सिनेमा ऑफ द वर्ल्ड (एका विशिष्ट देशाची निवड करून तेथील सिनेमे, उदाहरणार्थ, जपान, इराण इत्यादी), प्रायोगिक सिनेमे, क्लासिक सिनेमे, इंडियन पॅनोरमा, त्यावर्षी निधन झालेल्या बड्या सिनेकर्मींचे सिनेमे आणि बरेच काही. तुम्हाला फेस्टिव्हलचा कॅटलॉग पाहून आपल्याला नक्की काय पाहायचे आहे हे निश्चित करावे लागते, हे करण्यासाठी अनुभवी लोकांकडून घेतलेल्या टिप्स आणि आपला अभ्यास कामाला येतो. एकदा आपल्याला नक्की काय पाहायचे आहे हे निश्चित केल्यानंतर पुढचा प्रवास तसा सुकर होतो.