ग्लोबल महाराष्ट्र : सचिन ईटकर
जानेवारीत पुण्यात पार पडलेली ‘ग्लोबल आंत्रप्रेन्युअर कॉन्क्लेव्ह २०२५’ (जीईसी) कमालीची यशस्वी ठरली. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (एमईडीसी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि गर्जे मराठी ग्लोबल या संस्थांनी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेने महाराष्ट्रातील उद्योजकांना ग्लोबल व्यासपीठ दिले.
कृषिउद्योग, वाहननिर्मिती आणि आयटीआधारित उद्योगांसाठी देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. कृषी औद्योगिक समाजव्यवस्थेचा पाया घालण्याचे उद्दिष्ट राज्याच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आले होते. नवनिर्मित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी स्थापन करून समृद्ध औद्योगिक महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया रचला. सहकाराच्या तत्त्वावर आधारलेली साखर कारखानदारी त्यामुळे वाढली.
आज राज्यातील साखर उद्योगाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उलाढाल एक लाख कोटी रुपयांवर आहे. विकासाचे हे मॉडेल पुढे देशातील अनेक राज्यांनी आपलेसे केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नव्वदीच्या दशकात अर्थमंत्री असताना आर्थिक उदारीकरणाचा पाया रचला व नंतर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी उदारीकरणाच्या धोरणांना गती दिली, म्हणूनच भारत दिवाळखोरीच्या वाटेवरून मागे फिरला आणि पस्तीस वर्षांनंतर आज महत्त्वाची अर्थव्यवस्था झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘विकसित भारत २०४७’ची मुहूर्तमेढ रोवली असून या टप्प्यातून आपण सध्या मार्गक्रमण करीत आहोत.