

Pune Pandharpur Cycle Wari
esakal
वर्षा आठवले
एव्हाना अंतर आटोक्यातलं वाटू लागलं होतं. थोडावेळ बसल्यामुळे तरतरी आली होती. सुरुवातीला चाकाच्या डुगडुगण्यामुळे मनात थोडी भीती बसली होती, त्यामुळे सायकल वेगात चालवताना थोडं बिचकायला होत होतं. तरीही आता पंढरपुरापर्यंत सायकल चालवायचीच यावर मी ठाम होते. त्या रस्त्यावर एकही झाड नव्हतं. उन्हामुळे नको नको झालं होतं तरी नावालाही सावली मिळत नव्हती...
पंढरपूर साधारण ३० किलोमीटरवर राहिलं असावं. चहाचा ब्रेक घेतला होता. सूर्य मावळतीला आला होता, त्यामुळे थांबावं की नाही हा प्रश्न होताच, पण चहाची गरज होती. त्यामुळे चहासाठी थांबलो. वैभव गंधे, संजय पोवार आणि स्पंदन ही आमची टेक्निकल सपोर्टची टीम तिथं आमच्यासाठी थांबलेली होती. त्यांनी पहिल्यांदा आमच्या सायकली, त्यांची टायर्स चेक केले. हॉटेलमध्ये चहा सांगितला. आमचा चहा झाल्यावर सायकलला लाइट्स लावण्याची सूचना केली. ते लावायला मदत केली आणि आम्हाला निघायला सांगितलं. आम्ही सायकली चालवायला सुरुवात केली आणि पुढच्या अर्ध्या तासातच अगदी गुडुप अंधार झाला. आता आम्हाला सायकलींच्या दिव्यांवरच भरवसा ठेवायला लागणार होता, कारण त्या रस्त्यावर दिवे जवळपास नव्हतेच. पाठीमागून येणाऱ्यांना आम्ही बाजूने चाललो आहोत हे जाणवून देण्यासाठी सायकलचे टेल लॅम्प होते. पण पुढचे दिवे आता मात्र डिम होऊ लागले होते. त्यातून पुढून बऱ्याचशा गाड्या उलट्या दिशेनं येत होत्या. त्यांच्या प्रखर लाइट्सनी डोळे दिपून जात होते. शिवाय गाडी गेल्यानंतर पुढचं काहीच दिसत नव्हतं. काहीवेळानं हायवेवरच्या रस्त्याच्या बाजूच्या दोन पांढऱ्या पट्ट्यांच्या अलीकडचा रस्ता म्हणजे सर्व्हिस रोड आहे, आणि हे आपल्याला कळतच नाहीये, असंही आम्हाला वाटायला लागलं.