

Quantum Computing in India
esakal
श्रीनिवास शारंगपाणी
भारताकडे क्वांटम कॉम्प्युटिंगला जेमतेम सुरुवात झाली होती, क्वांटम प्रणाली बाळपावलं टाकत होती. मोठा अडथळा होता तो अतिशीत तापमान गाठण्याचा, जे भारतीय प्रयोगशाळांसाठी जवळपास अशक्य आहे, असंच विद्वानांचं मत होतं. मग भारताकडे अशी कोणती जादूची कांडी आहे, ज्यामुळे सर्वश्रेष्ठ प्रयोगशाळांसाठी जे काम जटिल होतं, ते भारताला शक्य झालं?
इस्राईलच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख मोशे लेव्ही सॅटेलाइट फोनवर जोरजोरात बोलत होते, ‘‘हे बघ डेव्हिड, तुला भारतात पाठवून उद्या एक महिना होईल आणि अजून तुला फारशी प्रगती करता आलेली नाही याचं मला अतीव दुःख झालेलं आहे. तुझे पूर्वज भारतातून इस्राईलला स्थलांतरित झालेत. तुला त्यांच्याकडून लहानपणापासून भारताचा इतिहास, संस्कृती या सगळ्याची माहिती मिळालेली आहे. तुला हिंदी आणि इंग्लिशसह तीन-चार भारतीय भाषाही अवगत आहेत. एवढं असूनही तुला अजून दिलेलं काम पूर्ण करता आलेलं नाही, याचा मला खेद वाटतो.’’
हैदराबादमध्ये भारत सरकारनं वर्षभरापूर्वी ‘इंटरनॅशनल नॉलेज ट्रान्स्फर सेंटर’नामक (आयकेटीसी) संस्था स्थापन केली होती. तिथेच अमित कुमार हे भारतीय नाव धारण करून तल्लख एजंट डेव्हिड रुबेन नोकरी करत होता. ही त्याची नोकरी कंत्राटी स्वरूपाचीच होती. शासकीय प्रणालीतील विविध छिद्रं आणि पळवाटा शोधून डेव्हिडनं अमित कुमार या नावानं आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रं केव्हाच हस्तगत केली होती. पण इतकी मजल मारूनही त्याला दिलेल्या कामात अजून यश मिळालेलं नव्हतं.
‘‘सर, मला अजून थोडा अवधी द्या. तुम्हाला माहीत आहेच, भारतानं मे १९७४ आणि मे १९९८मध्ये अणुस्फोट केले होते आणि त्याचा थांगपत्ता अमेरिकेच्या सीआयए आणि रशियाच्या केजीबीलाही लागला नव्हता. उच्च दर्जाचं गुपित कसं ठेवायचं ते भारतीयांना चांगलंच माहीत आहे. पण मी प्रयत्न करतोय आणि मला लवकरच यश मिळेल अशी आशा आहे,’’ डेव्हिडनं आपला बचाव केला.